अडरे : चिपळूण तालुक्यात झालेल्या तौक्ते चक्रीवादळाचा फटका तालुक्यातील ग्रामीण भागातील आंबा-काजू बागायतदारांना मोठ्या प्रमाणात बसला असून, तालुक्यातील एकूण ७५.७४ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. तर या वादळात ५८७ शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, आत्तापर्यंत ४५६ शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचे काम कृषी सहाय्यकांकडून सुरू आहे. यामध्ये दोनप्रकारे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यात येणार आहेत. त्यामध्ये एक वादळाने झाडे उन्मळून पडल्याने व झाडावरील आंबे पडून झालेल्या नुकसानाचा समावेश आहे.
चिपळूण तालुक्यात आंबा ६ हजार हेक्टर क्षेत्रावर तर काजू १३ हजार हेक्टर क्षेत्रावर असे एकूण १९ हजार हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे. मात्र, दरवर्षी पडणाऱ्या अवकाळी पाऊस व वादळाने मोठ्या प्रमाणात नुकसान होते. चिपळूण तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. या वादळाने ग्रामीण भागातील घरांवरील पत्रे उडून नुकसान झाले आहे तसेच घरांवर झाडे पडल्याने व सार्वजनिक मालमत्तेचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचबरोबर तालुक्यातील प्राथमिक अंदाजानुसार १३० गावांमधील आंबा व काजू बागायतदारांचेही नुकसान झाले आहे. गेल्यावर्षी झालेल्या निसर्ग चक्रीवादळाने पुरता उद्ध्वस्त झालेला शेतकरी पुन्हा यावर्षी तौक्ते चक्रीवादळाने उद्ध्वस्त झाला आहे. काढणीयोग्य तयार झालेल्या आंब्याची झाडे उन्मळून पडल्याने व झाडावरील आंबे गळून पडल्याने नुकसान झाले आहे. कृषी विभागात कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यामुळे तालक्यातील १३० गावांमधील शेतकऱ्यांचे अवघे १९ कर्मचारी पंचनामे करत असून, या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडत आहे. शेतकऱ्यांचे नुकसान झालेल्या क्षेत्राचे पंचनामे करण्याचे काम तालुका कृषी अधिकारी राहुल अडके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.