रत्नागिरी : रत्नागिरी किनारपट्टीवर निसर्ग चक्रीवादळाचे आगमन झाले असून सध्या मोठ्या प्रमाणावर जाेरदार पावसासह प्रचंड वेगाने वारे वाहत आहेत. मंगळवारी मध्यरात्रीपासूनच वेगाने वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी विद्युत प्रवाह खंडीत झाला आहे.
सध्या रत्नागिरी, मालगुंड, जाकादेवी, पूर्णगड, पावस, हेदवी या भागात वाऱ्यांचा वेग ९० किमीपेक्षा जास्त आहे. तर जयगड किनाऱ्यावर हा वेग ११० इतका आहे. संगमेश्वर कोयनापर्यंत वाऱ्याचा वेग सध्या ९०किमीपेक्षा जास्त आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली आणि मंडणगड किनारपट्टीवरील वाऱ्याचा वेग ताशी १२० राहील असा अंदाज आहे.
निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सज्ज आहे अनेक ठिकाणी आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आले आहेत. नागरिकांनी काळजी घ्यावी, घराबाहेर पडू नये, मदतीची गरज असेल त्यावेळी आपत्कालीन यंत्रणेशी संपर्क साधावा, असे आवाहन रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केले आहे. निसर्ग चक्रीवादळ अलिबागच्या दिशेने सरकत असून, त्याच्या लँडिंग पॉइंट सध्या मुरुड, काशिद रेवदंडा असा दाखवत आहे.