लाेकमत न्यूज नेटवर्क
मंडणगड : तालुक्यात रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास वारा व किरकोळ पावसासह ताेक्ते चक्रीवादळाने रात्रीच्या अंधारात तालुक्यात प्रवेश केला. सोमवार (१७ मे) रोजी सकाळी १० वाजेपर्यंत वादळी वाऱ्यांचा प्रभाव दिसून आला. वादळामुळे घरांचे नुकसान कमी झाले. त्यातही मागील वर्षीच्या वादळाच्या तुलनेत यंदा वाऱ्याचा वेग निम्मा हाेता़
तालुक्यातील नारायण नगर, वेळास व खाडीकिनारी असलेल्या ५०८ कुटुंबांच्या प्रशासनाने सुरक्षित स्थळी रविवारीच स्थलांतर केले होते़ तसेच मंडणगड तहसील कार्यालय, मंडणगड नगरपंचायत व बाणकोट पोलीस स्थानक येथे आपत्कालीन व्यवस्था तयार ठेवण्यात आली होती. महसूल प्रशासनाने मंडणगड तहसील कार्यालयात या आपत्तीच्या निवारणाकरिता प्रांताधिकारी शरद पवार, तहसीलदार नारायण वेंगुर्लेकर व आमदार योगेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्कालीन कक्ष उभा केला आहे़ सर्व प्रशासकीय अधिकारी रात्रभर तालुक्यातील स्थितीवर लक्ष ठेवून होते़ वादळ थांबताच सर्व मुख्य अधिकाऱ्यांनी तालुक्यातील नुकसानाचा अंदाज घेण्यासाठी तालुक्याचा दौरा केला.
वेळास बाणकोट, हिंमतगड किल्ला परिसरातील कांटे, केंगवले, रानवली, गुढेघर याचबरोबर सावित्री खाडीलगतची वेसवी, शिपोळे, उमरोली, वाल्मीकीनगर, कुडूक, गोठे, पंदेरी, पेवे, पडवे, उंबरशेत व म्हाप्रळ ही गावे वादळामुळे प्रभावित होण्याची जास्त शक्यता या सर्व गावांवर प्रशासनाने बारीक लक्ष ठेवले होते.
वादळानंतर तालुक्याचा आढावा घेतल्यावर तहसीलदार नाराय़ण वेंगुर्लेकर यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार ताेक्ते वादळामुळे तालुक्यात झालेल्या किरकोळ नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम महसूल विभागाने सुरू केले आहे़ आगामी दोन दिवसात पंचनामे पूर्ण करण्याचे काम पूर्ण होणार आहे, असे तहसीलदार नारायण वेंगुर्लेकर यांनी सांगितले़
तालुक्यातील येणाऱ्या तौक्ते वादळाची पूर्वतयारी म्हणून महावितरण कंपनीने रविवारी दिवसभर ठरावीक कालावधीनंतर वीजपुरवठा खंडित करीत होते. दुपारी तीननंतर वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित झाले़ यामुळे तालुकावासीय अंधारात होते़ ग्रामीण भागात याचा अधिक परिणाम दिसला. वादळामुळे झाडे पडून रस्ता बंद होण्याचा प्रकार न झाल्याने तालुक्याच्या रस्त्याच्या माध्यमातून ग्रामीण भागाशी असलेला संपर्क कायम राहिला व रस्ता बंद होण्याची वेळ आल्यास जेसीबी, कटर चालविणारी तज्ज्ञ माणसे व मलगा साफ करण्यासाठी ट्रॅक्टर सज्ज ठेवण्यात आले होते. वेळास साखरी दरम्यान प्रगती पथावर काम सुरू असलेला रिलायंस कंपनीचा मोबाइल टॉवर वादळामुळे जमीनदोस्त झाला.
--------------------
मंडणगड तालुक्यात वादळामुळे साखरी येथे मोबाइल टॉवर काेसळला आहे़