खेड : तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा तालुक्यातील काही गावांना बसला असून, महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी साेमवारी सकाळपासून पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे. चक्रीवादळाचा तडाखा प्रामुख्याने खाडीपट्ट्यातील व सह्याद्री पट्ट्यातील गावांना बसला आहे. खेड तहसीलदार कार्यालयातून दिलेल्या माहितीनुसार दुपारपर्यंत आठ गावांतील १५ घरांचे व एका गोठ्याचे सुमारे दोन लाख चाळीस हजार रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे.
तालुक्यात शिर्शी येथील हनिफ इब्राहिम मांडलेकर यांच्या घराचे पूर्णतः नुकसान झाले आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, निगडे येथील लीला मोहिते व अनुष्का मोरे, खोपी येथील मोहन जानू ढेबे, बाळाराम जानू बर्गे, भागोजी रामचंद्र आखाडे व छत्रपती शिवाजी हायस्कूल ज्युनिअर कॉलेज, जैतापूर येथील गोपीनाथ राजाराम मोरे, गणपत विश्राम मोरे व सुरेश सीताराम गोरे, रजवेल येथे विश्वास रामचंद्र निकम, शिर्शी येथील हलिमा सिराजुद्दिन हमदुले, वेरळ येथे मनोज गणपत कदम, जांभुर्डे येथे हरिश्चंद्र रामा पाते व आस्तान चंद्रकांत कोंडीराम मोरे यांच्या घरांचे अंशतः नुकसान झाले आहे. खोपी येथील भागोजी आखाडे यांच्या गोठ्याचे अंशतः नुकसान झाले आहे. या चक्रीवादळामुळे तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची शक्यता असून, महसूल विभागाकडून ठिकठिकाणी पंचनामे सुरू आहेत. सद्य:स्थितीत नुकसानग्रस्त भागात पंचनामे करण्याचे काम सुरू असल्याने नुकसानग्रस्त ग्रामस्थांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
--------------------------
खेड तालुक्यातील खोपी येथील जानू ढेबे यांच्या घराचे नुकसान झाले आहे.