लांजा : तालुक्यातील दाभोळे - भांबेड वाटूळ रस्त्याचे काम लाॅकडाऊनमुळे रखडले हाेते. या रस्त्याचे काम हाेण्यासाठी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दत्ता कदम यांनी गेली दोन वर्षे पाठपुरावा केला हाेता. त्यानंतर आता हे खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
सन २०२०मध्ये दाभोळे - वाटूळ रस्त्याचे रुंदीकरण व मजबुतीकरण तसेच अनेक ठिकाणी मोऱ्या व रस्त्यावरील पूल बांधण्यासाठी महाराष्ट्र रस्ते सुधारणा प्रकल्पाअंतर्गत ८३ कोटी रुपये इतका निधी मंजूर झाला होता. त्यानंतर दिनांक ३ फेब्रुवारी २०२० रोजी रस्त्याच्या कामाचा शुभारंभही करण्यात आला होता. मात्र, गेल्यावर्षी कोरोनाचे संकट आल्याने लाॅकडाऊन करण्यात आल्याने मंजूर झालेले काम रखडले गेले. दाभोळे - शिपोशी - कोर्ले - वाटूळ रस्ता खड्डेमय झाला हाेता.
जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दत्ता कदम यांनी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी प्रत्यक्ष भेटून निवेदने देऊन तसेच आंदोलने करत रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्याची मागणी केली हाेती. मात्र, ठेकेदार कामाला सुरूवात करत नसल्याने दत्ता कदम यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर लाॅकडाऊन असतानाही ठेकेदार यांनी या रस्त्यावर पडलेले खड्डे भरण्यास सुरुवात केली आहे.