आंजर्ले : दापोलीत प्रथमच सालदुरे येथे कबड्डी प्रीमियर लीगचा थरार सोमवारपासून सुरू झाला आहे. या स्पर्धेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला आहे. कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने जय सीमा माता क्रीडा मंडळ, सालदुरे आयोजित दापोली तालुका कबड्डी निवड चाचणी स्पर्धा व जय सीमा माता कबड्डी प्रीमियर लीग २०१४च्या स्पर्धेला सुरूवात झाली आहे. या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय खेळाडू शैलेश सावंत, राष्ट्रीय खेळाडू चंद्रशेखर ऊर्फ बंटी पाटील, रोहित शिरतोडे असे नामवंत खेळाडू सहभागी झाले असून, त्यांचा बहारदार खेळ प्रेक्षकांना पाहावयास मिळत आहे.स्पर्धेची सुरूवात सीमा मातेचे दर्शन घेऊन झाली. त्यानंतर मंदिराजवळ असलेल्या जुन्या क्रीडांगणाला वंदन करुन गावातून रॅली काढण्यात आली. कबड्डी प्रीमियर लिगमध्ये उद्घाटनाचा सामाना सन्मित्र रायडर्स, सालदुरे व प्रिया बीच रिसॉर्ट, आंजर्ले यांच्यामध्ये खेळवला गेला. यामध्ये सन्मित्र रायडर्सच्या रोहित शिरतोडे व संदेश झगडे यांच्या कामगिरीच्या जोरावर विजय मिळत उद्घाटनाचा सामना जिंकला. दुसरा सामना जय भवानी प्रतिष्ठान, हर्णै व प्रिन्सेस ईश्वरी, पाळंदे यांच्यामध्ये झाला.यामध्ये प्रणय आंबेकर याच्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर जय भवानी प्रतिष्ठान, हर्णै कबड्डी संघाने प्रिन्सेस ईश्वरी, पाळंदे कबड्डी संघावर विजय मिळवत हा सामना जिंकला. केळशीच्या शैलेश सावंतची संयमी खेळी व संघ सहकार्याच्या उत्तम सांघिक खेळामुळे हा सामना केवळ तीन गुणांनी प्रिन्सेस शकिला, हर्णै संघाला जिंकता आला. चौथा सामना जे. के. स्पोर्टस्, गिम्हवणे व सागर सावली फायटर, दापोली यांच्यामध्ये झाला.अक्षय सुर्वेच्या उत्तम खेळीमुळे जे. के. स्पोर्टस्, गिम्हवणे संघाने आपला स्पर्धेतील पहिला विजय नोंदविला. प्रिया बीच रिसॉर्ट, आंजर्ले व साईयात्री, दापोली यांच्यात झालेल्या रंगतदार सामन्यात बंटी पाटील व सागर बोरकर यांनी उत्तम खेळ केला. हा सामना साईयात्री, दापोली संघाने जिंकला. जय भवानी प्रतिष्ठान, हर्णै विरूध्द जे. के. स्पोर्टस्, गिम्हवणे यांच्यात झालेल्या सामन्यात जे. के. स्पोर्टस् संघ विजयी झाला. या सामन्यात जे. के. स्पोर्टस्च्या नरेंद्र भडवळकर याने उत्तम खेळ केला. (वार्ताहर)
दापोलीत कबड्डी प्रीमियर लिगचा थरार
By admin | Published: October 28, 2014 10:52 PM