दापोली : टंचाईग्रस्त गाव ते शासनाचा जलमित्र पुरस्कार अशी मजल दापोली तालुक्यातील कर्दे गावाने मारली असून कायमची टंचाईमुक्ती मिळवलेल्या या गावाला जलसंपदा मंत्री राम शिंदे यांच्याहस्ते जलमित्र पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहेदापोली तालुक्यातील कर्दे गावाने जलयुक्त शिवार अभियानाच्या पहिल्यावर्षी सन २०१५-२०१६मध्ये सक्रिय सहभाग घेतला होता. जलयुक्त शिवार अभियानात निवड झालेल्या या गावाने केलेल्या उत्कृष्ट कामाची शासनाकडून दखल घेण्यात आली आहे.गावाने केलेल्या कामाचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. दुसरीकडे या गावातील जलयुक्त शिवार अभियानामुळे शिवारातील पाणीपातळीत कमालीची वाढ होऊन मोहिमेचे फलित आता गावात जाणवू लागले आहेत.समुद्रकिनारपट्टीवर असलेल्या कर्दे गावाच्या एका बाजूला अथांग समुद्र तर दुसऱ्या बाजूला प्रचंड डोंगर उतार अशा विचित्र भोगोलिक परिस्थितीत वसलेल्या या गावातील शिवारात पावसाचे पाणी साचून न राहता थेट समुद्र्राला जाऊन मिळत होते.
अशा परिस्थितीत गावाला पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवून पाणीटंचाई सदृश्य परिस्थितीचा सामना करावा लागत होता. परंतु जलयुक्त शिवार अभियानाच्या पहिल्याचवर्षी या गावाची निवड जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत झाली व गावाचे भाग्यच उजाळले.या मोहिमेअंतर्गत शिवारात तीन सिमेंट बंधारे, मातीचे दोन बंधारे, दगडी बंधारे, सलग समतल चर, गॅबियन बंधारे विविध कामाच्या माध्यमातून पावसाचे पाणी साठविण्यात आले. पावसाचे वाहून जाणारे पाणी जमिनीत मुरविण्यात येऊ लागल्याने शिवारातील पाणीसाठ्यात वाढ झाली.
पाणी पातळीत झालेल्या वाढीमुळे पिण्याच्या पाण्यातून कायमस्वरूपी सुटका झाली आहे. पाणीसाठ्यात वाढ झाल्यामुळे नारळ, आंबा-काजूच्या बागांना मुबलक पाणी उपलब्ध झाले असून बागायती शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळायला लागले आहे. गावाच्या पाणीटंचाईबरोबरच शेतकऱ्यांच्या अर्थकारणालाही बळकटी मिळाली आहे .
गावाशेजारी असणाऱ्या डोंगरात सलग समतल चर मारण्यात आल्याने डोंगरातील पाणी त्याचठिकाणी अडविले जाते. डोंगर उत्तरातील पाणी कधीकाळी वाहून जात होते. मात्र आता पावसाचे पाणी अडविण्यात यश आले आहे. दापोली तालुक्यातील कर्दे गावाने उत्कृष्ट काम करून जिल्हास्तरीय द्वितीय पुरस्कार पटकावला आहे.
कर्दे गावाने कायमस्वरूपी पाणी टंचाईवर मात करून या समस्येतून सुटका करून घेतली आहे. तालुक्यात अजून काही गावे टंचाई ग्रस्त आहेत. अशा गावांचा समावेश जलयुक्त शिवार अभियानात होऊन, तालुकाटंचाई मुक्त व्हावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
जलयुक्त शिवार अभियानाच्या पहिल्याचवर्षी दापोली तालुक्यातील वनौशीतर्फे पंचनदी या गावाने जिल्हास्तरीय द्वितीय, व कर्दे गावाने उत्कृष्ट काम करून जिल्हास्तरीय तृतीय क्रमांक पटकावला आहे. या गावाने मोहिमेत दाखविलेला लोकसहभागसुद्धा तितकाच महत्वाचा आहे. जलयुक्त शिवार अभियान मोहीम शेतकऱ्यांसाठी खूप उपयुक्त असून पुढील काळात दूरगामी फलित या योजनेचे आढळून येतील.मुरलीधर नागदिवे,तालुका कृषी अधिकारी, दापोली