दापोली : दापोली शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच तीनवेळा यादीत फेरबदल करण्यात आल्याने संभ्रम अधिकच वाढला असून, शिवसेना नेते रामदास कदम समर्थक यांना यादीत ‘इन’ करण्यात आले आहे. तसेच दळवी समर्थकांना ‘आऊट’ करण्यात आल्याने स्मिता जावक विद्यमान जिल्हा परिषद सदस्य दळवी समर्थकर यांनी बुरोंडी गटातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक उमेदवार अपक्ष निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे शिवसेनेत चांगलाच संभ्रम वाढला आहे. दापोली पंचायत समिती व जिल्हा परिषद उमेदवारी यादीत माजी आमदार सूर्यकांत दळवी समर्थकांना डावलून बहुतांश रामदास कदम समर्थकांची वर्णी लागल्याने दळवी गट नाराज झाला होता. त्यामुळे दळवी गटातील पदाधिकाऱ्यांनी पदाचे राजीनामे देऊन थेट मातोश्री गाठली होती. त्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा होऊन उमेदवारी यादीत फेरबदल करण्यात आला. त्यामध्ये दळवी समर्थकांची वर्णी लावली होती. मात्र, हा निर्णय पुन्हा बदलून सहा दळवी समर्थकांचे पत्ते कट करण्यात आले आणि तेथे रामदास कदम समर्थकांची वर्णी लावण्यात आली आहे. एकदा दुरुस्त केलेल्या यादीत फेरबदल केल्यामुळे दळवी गटातील कार्यकर्ते दुखावले जाऊन काहींनी भाजपमधून निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेच्या दाभोळ जिल्हा परिषद सदस्य स्मिता जावकर यांना उमेदवारी मिळावी याकरिता माजी आमदार दळवी यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले. त्या प्रयत्नाला यशसुद्धा आले होते. परंतु पुन्हा त्याचे नाव वगळून प्रदीप राणे यांची वर्णी लावण्यात आल्यामुळे पक्षाच्या निर्णयावर नाराज झालेल्या जावकर या शेवटच्या दिवशी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. शिवसैनिकांवर अन्याय झाल्यामुळे अनेक शिवसैनिक भाजपच्या वाटेवर आहेत. काहींनी आपली उमेदवारी अपक्ष म्हणून ठेवण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे दापोली शिवसेनेची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे. रामदास कदम, सूर्यकांत दळवी यांच्यातील वादामुळे सामान्य शिवसैनिक मात्र संभ्रमात पडला आहे. (प्रतिनिधी) रामदास कदम यांच्यामुळेच आपण भाजपकडून निवडणुकीला सामोरे जात आहोत. यश येवो किंवा न येवो, हे मतदारावर अवलंबून आहे. परंतु एखाद्या नेत्याने खालच्या पातळीवर माझ्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्तीवर टीका करणे योग्य नव्हे, असे म्हणत स्मिता जावकर यांनी शिवसेना सोडताना आपल्याला खूप दु:ख होत असल्याचे सांगितले. माझ्यासारखे अनेक शिवसैनिक भाजपमधून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पक्षाला आमची किंमत वेळ निघून गेल्यावर कळेल. -स्मिता जावकर, दळवी समर्थक, दापोली
दळवी समर्थक भाजपमधून रिंगणात
By admin | Published: February 06, 2017 12:48 AM