रत्नागिरी : पणदेरी लघुपाटबंधारे प्रकल्पाची गळती थांबविण्यासाठी (ता. मंडणगड) रत्नागिरी पाटबंधारे विभागाकडून उपाययोजना हाती घेण्यात आल्या. धरण सुरक्षिततेच्या बाबतीत ‘डॅम सेफ ऑर्गनायझेशन’चे कार्यकारी अभियंता यांनी धरणास भेट दिली असून धरण सुरक्षित असल्याचा निष्कर्ष नोंदविला आहे.
पणदेरी लघुपाटबंधारे प्रकल्प (ता. मंडणगड) योजनेतंर्गत पणदेरी धरण १९९५-९६ मध्ये पूर्ण करण्यात आले आहे. ५ जुलैला दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास धरणातून गळती होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर रत्नागिरी पाटबंधारे विभागाकडून गळती थांबविण्यासाठी तत्काळ उपाययोजना हाती घेण्यात आल्या. त्यामध्ये मातीचा भराव करून गळती थांबविण्याचे काम सुरू आहे. धरणफुटीचा धोका टाळण्यासाठी सांडवा मोकळा करून धरणातील पाण्याची पातळी कमी धरणाच्या खालच्या बाजूस पणदेरी मोहल्ला, सुतारवाडी, पाटीलवाडी, कुंभारवाडी, रोहिदासवाडी व बौद्धवाडी येथे लोकवस्ती असून या वाडी व गावातील लोकांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.
जीवितहानी टाळण्याच्या दृष्टीने रोहिदासवाडी व बौद्धवाडी येथील सुमारे २०० ग्रामस्थांना त्यांच्या मौल्यवान वस्तूंसह सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले आहे. त्यांच्या भोजनाची व निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. सुरक्षिततेची उपाययोजना म्हणून धरणाच्या ठिकाणी स्वयंसेवकांच्या मदतीने बचाव पथक कार्यरत आहे. त्याशिवाय ॲम्ब्युलन्ससह आरोग्य पथक, पुरेसा पोलीस बंदोबस्त व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक घटनास्थळी तैनात करण्यात आले आहे. सद्य:स्थितीत जीवितहानी टाळण्याच्या दृष्टीने सर्व उपाययोजना करण्यात येत असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
धरण सुरक्षिततेच्या बाबतीत ‘डॅम सेफ ऑर्गनायझेशन’चे‘डॅम सेफ ऑर्गनायझेशन’चे कार्यकारी अभियंता यांनी धरणास भेट दिली असून धरण सुरक्षित असल्याचा निष्कर्ष नोंदविला आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी तथापि घाबरुन जाण्याचे कारण नाही तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये. कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होत असल्याची शक्यता निदर्शनास आल्यास मंडणगडचे तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केले आहे.