मंडणगड : तालुक्यातील पाचही धरण प्रकल्पांतील पाणी सिंचनासाठी वापरात यावे, याकरिता आगामी काळात प्रयत्न करणार असल्याचे आमदार योगेश कदम यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. पणंदेरी धरण प्रकल्पास लागलेल्या गळतीच्या समस्येनंतर धरणाच्या पाण्याच्या विनावापराची समस्या पुन्हा एकदा पुढे आली आहे.
तालुक्यात चिंचाळी, पणदेरी, तुळशी, भोळवली व तिडे या गावांत धरण प्रकल्प पूर्णत्वास आलेले असले तरी कालवे पूर्ण झालेले नसल्याने व काही धरणांत गाळ साठल्याने पाण्याचा सिंचनाकरिता वापर झालेला नाही. या पार्श्वभूमीवर आमदार योगेश कदम यांनी सर्वच धरणांचा आढावा घेतला आहे. सर्व धरण प्रकल्पाचे माध्यमातून तालुक्याने सुमारे एक हजार हेक्टर जमीन क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. धरणातील पाणीसाठ्यामुळे धरणव्याप्त सिंचन प्रभावाखाली तेरा गावांतील जलसाठे निश्चितपणे वाढलेले आहेत. अगदी धरणातील पाणीगळतीमुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी बारमाही पाणी उपलब्ध झाले आहे. त्यातून लाटवण व तिडे पंचक्रोशीत दरवर्षी कलिंगडाच्या शेतीत वाढ होत आहे. यात स्थानिक शेतकऱ्यांचा लक्षणीय सहभाग आहे. सर्वच धरण प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी पाटबंधारे विभाग शेतकरी यांच्यातील समन्वय वाढविण्याचे आमदार योगेश कदम यांनी नियोजन केले आहे.
पंदेरी, भोळवली, चिंचाळी, तिडे येथील सर्व अपूर्ण कालव्यांची कामे अग्रक्रमाने मार्गी लावण्याकरिता आमदार योगेश कदम यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. याचबरोबर तुळशी धरणातील गाळ यंदा काढण्यात येणार आहे. तालुक्यातील पारंपरिक शेतीला दुबार शेतीची जोड देत दुबार शेतीकडे स्थानिक शेतकऱ्यांनी वळावे यासाठी नियोजन करून स्थानिक पातळीवर शेतीच्या माध्यमातून रोजगार निर्मिती व्हावी, येथील तरुणांना स्थानिक पातळीवर रोजगार मिळवून देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांच्या सक्रिय सहभागाने नियोजन सुरू केलेले असल्याचे आमदार योगेश कदम यांनी सांगितले.