दापोली : दापोली तालुक्यातील मुरुड येथील समुद्राला आलेल्या उधाणाचे पाणी शेतीमध्ये शिरुन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. तालुक्यातील मुरुड समुद्रकिनारी काही भागाला धूप प्रतिबंधक बंधारे नाहीत. वेळोवेळी मागणी करुनही दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत.
भातशेती पुन्हा पाण्याखाली
राजापूर : तालुक्यात सुरु असलेल्या अतिवृष्टीत दोनिवडे येथील भातशेती पुन्हा एकदा पाण्याखाली गेली आहे. राजापूर रेल्वेस्थानक रस्त्यावर पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. दोनिवडे ब्रम्हदेववाडी व मुख्य बसस्थानकासमोरील शेतीचा मळा ४ दिवस पाण्याखाली आहे.
उपकेंद्र पुरात
गुहागर : तळवली प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत पेवे आरोग्य उपकेंद्र गेले २ दिवस पुराच्या पाण्यात आहे. हे उपकेंद्र खाडीकिनारी असल्याने पुराचे पाणी केंद्रात जाऊन नुकसान झाले. त्यामुळे येथील लसीकरणही ठप्प झाले असून, येथे येणाऱ्या रुग्णांवर उपचार करणे कठीण बनले आहे. तालुक्यात बरेच दिवस पाऊस पडत आहे. खाडीकिनारच्या गावांना याचा मोठा फटका बसत आहे.
जनजीवन पूर्वपदावर
खेड : गेल्या आठवडाभरापासून थैमान घालणाऱ्या पावसाने मंगळवारी सकाळपासून विश्रांती घेतल्याने विस्कळीत जनजीवन पूर्वपदावर आले. सोमवारी दिवसभर पडणाऱ्या पावसाने संध्याकाळच्या सुमारास उघडीप घेतल्याने पुराचा धोका टळताच व्यापाऱ्यांसह नदीकाठच्या रहिवाशांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
अध्यक्षपदी मोरे
खेड : महाराष्ट राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार, कार्याध्यक्ष व खासदार गजानन किर्तीकर यांच्या आदेशानुसार, तालुक्यातील आंबये गावचे सुपुत्र विश्वास मोरे यांची महाराष्ट राज्य असोसिएशनच्या पंच मंडळ अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. राष्टीय कबड्डी स्पर्धेत मुख्य व्यवस्थापक म्हणून त्यांचा सहभाग होता. मुंबई कबड्डी असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी म्हणून त्यांनी काम केले आहे.
माजी शिक्षक मेळावा
दापोली : दापोलीतील ए. जी. हायस्कूलमध्ये माजी शिक्षक मेळावा उत्साहात पार पडला. स्वागत मुख्याध्यापक सतीश जोशी यांनी केले. या मेळाव्यामध्ये संस्थाचालक व संस्था सचिव डाॅ. प्रसाद करमरकर यांनी संस्थेतील अंगणवाडीपासून ते पदव्युत्तरापर्यंतच्या सर्व विभागांचा आढावा घेतला. शालेय समिती चेअरमन नीलिमा देशमुख यांनी शैक्षणिक प्रगती, सहशालेय उपक्रम याविषयी समाधान व्यक्त केले.
२६ जुलै रोजी धरणे
खेड : प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीच्यावतीने २६ जुलै रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ५ यावेळेत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबतचे निवेदन संघटनाध्यक्ष प्रकाश काजवे, सरचिटणीस संतोष सुर्वे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. इंदुराणी जाखड यांच्यासह शिक्षण सभापती व शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहे. प्रलंबित मागण्यांसाठी हे आंदोलन छेडण्यात येणार आहे.
बालयुवा रत्न पुरस्कार
चिपळूण: राज्य सरपंच सेवा संघाचा बालयुवा युवारत्न पुरस्कार परशुराम येथील बालकलाकार आर्यन पाटील याला जाहीर झाला. राज्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेत त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा, यासाठी राज्य सरपंच सेवा संघातर्फे विशेष पुरस्काराने गौरविले जाते. एस. पी. एम., परशुराम शाळेत सातवीत शिकणाऱ्या आर्यनची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
मोरगे यांना पीएचडी
संगमेश्वर : पैसाफंड हायस्कूलचे शिक्षक दिलीप मोरगे यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड अंतर्गत महात्मा गांधी महाविद्यालय, अहमदपूर, जिल्हा लातूर येथून डाॅ. एन. बी. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली भूगोल विषयात ‘रत्नागिरी जिल्ह्यातील लोकसंख्येच्या वैशिष्ट्यांचा अभिक्षेत्रीय बदल एक भौगोलिक अभ्यास’ हा विषय घेऊन पी. एचडी. प्राप्त केली आहे.