मंडणगड : पाच दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मंडणगड तालुक्यात एका घराचे पूर्णत:, तीन घरांचे अंशत: व एका गोठ्याचे नुकसान झाल्याची माहिती तहसील कार्यालयातून देण्यात आली आहे.
तालुक्यातील मौजे तिडे या गावात एका घराचे पूर्ण नुकसान झाले आहे. मौजे केळवत येथील दोन व मौजे भिंगळोली येथील एका घराचे अंशत: नुकसान झाले आहे. मौजे कादवण येथे एका गोठ्याचे अंशत: नुकसान झाले आहे. नुकसानाचे पंचनामे पूर्ण करण्याचे काम सुुरू असल्याने कुणाचे किती रकमेचे नुकसान झालेले आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही़ तालुक्यात पावसाची संततधार सुरू असून, १९ जून २०२१ अखेर तालुक्यात ९६३ मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यातील भारजा व निवळी या नद्यांसह सर्वच लहान-मोठे ओढे तुडुंब भरून वाहू लागले आहेत. शेतशिवारातून पाणी साचल्याने उगवण झालेली भाताची रोपे पाण्याखाली गेली आहेत. तालुक्यातील पाचही धरणांच्या पाण्याचे पातळीत पाच दिवसातील अतिवृष्टीने वाढ झाली आहे.