गुहागर : तालुक्यात मध्यरात्री झालेल्या तौक्ते वादळामुळे वेगवेगळ्या ठिकाणी लाखो रुपयांचे नुकसान झाले असले तरी एकाच ठिकाणी, मोठ्या स्वरूपात नुकसानाची नोंद तसेच कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.
गेले दोन दिवस तालुक्यात वादळ घोंघावणार असल्याने प्रशासनाची या वादळी परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयारी सुरू होती. याआधी फयान व त्यानंतर निसर्ग वादळाचा तडाखा तालुक्याला बसला होता. यामुळे आता तौक्ते वादळामुळे आणखी कोणत्या नुकसानीला सामोरे जावे लागते. या भीतीच्या छायेखाली तालुकावासीय होते. प्रशासनाने जाहीर केल्याप्रमाणे रात्री उशिरापासून वादळाचा जोर वाढत असल्याचे जाणवू लागले होते. उशिरा पहाटे ३ पर्यंत हा जोर कायम होता. मात्र पहाटे ४ च्या दरम्यान वादळाचा व पावसाचा जोर आणखी वाढला. तब्बल एक तास हा वाढलेला जोर कायम होता. त्यानंतर सकाळी ६ नंतर वादळी वारा व पाऊस बऱ्याच अंशी कमी आला होता. याबाबत महसूल विभागात संपर्क साधला असता तालुक्यात कोणत्याही एकाच ठिकाणी मोठ्या प्रकारची हानी झालेली नाही. यापूर्वी आलेल्या फयान व निसर्ग वादळाच्या तुलनेने तालुक्यात गावागावात थोड्याफार प्रमाणात नुकसान झाल्याचे सांगितले.
वादळाच्या पार्श्वभूमीवर रविवारी दुपारपासूनच वीज बंद ठेवण्यात आली होती. याबाबत वीज मंडळाच्या उपअभियंत्या भालकर यांच्याशी संपर्क साधला असता वादळामुळे पोल वाकणे, तारा तुटणे आदी स्वरूपातील नुकसान झाले असून सर्व ठिकाणांहून येणार्या अहवालानंतर नक्की किती आर्थिक नुकसान झाले आहे हे सांगता येईल असे सांगितले.
तहसील कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार भातगाव येथील पाच घरांचे छपर उडून अंशत: नुकसान झाले. तसेच इलेक्ट्रिक वायरचा शाॅक लागून बैलाचा मृत्यू झाला आहे. कुंडलीतही काही घरांच्या नुकसानीची नोंद झाली आहे. गुहागर शहरात वरचापाट मोहल्ला येथील घरांचे छप्पर कोसळून घरामधील एका महिलेला व पुरुषाला किरकोळ दुखापत झाली आहे. वरचापाट येथील विवेक खरे यांच्या घरासमोरील पोल वाकून वायर खाली आल्या. जीवन शिक्षण शाळा नं. १ ची लोखंडी शेड वाकली. तालुक्यात अनेकांचे माडपोफळी पडून नुकसान झाले आहे.