रत्नागिरी : तौक्ते चक्रीवादळामुळे आंबा पिकाचे नुकसान झाले आहे. शेवटचा आंबा हातात येण्यापूर्वीच सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आंबा जमीनदोस्त झाला आहे. आधीच आंबा कमी त्यातच वादळामुळे तयार पीक वाया गेल्याने शेतकऱ्यांना आर्थिक झळ सोसावी लागणार आहे.
हवामानातील बदलामुळे आंबा उत्पादन घटले आहे. लांबलेला पाऊस, थंडीचे घटलेले प्रमाण तसेच अवेळचा पाऊस यातून बचावलेला आंबा शेतकऱ्यांनी बाजारात पाठविला. मात्र जेमतेम १५ ते २० टक्केच आंबा यावर्षी बाजारात आला. त्यातच शेवटच्या मोहोराचा आंबा तयार नसल्यामुळे झाडावर होता. कोवळा आंबा मे महिन्याच्या शेवटी तयार होणार असल्याने शेतकऱ्यांनी काढण्याची घाई केली नव्हती.
मात्र सोसाट्याचा वारा व मुसळधार पर्जन्यवृष्टी यामुळे आंबा जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक झळ बसली आहे. वाऱ्यामुळे झाडांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काही ठिकाणी झाडांच्या फांद्या मोडल्या आहेत तर काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची वित्त हानी मोठ्या प्रमाणावर झाली आहे. याबाबत कृषी विभागाने तातडीने पंचनामा करणे गरजेचे आहे.
फळपीक विमा योजनेंतर्गत अवेळचा पाऊस, उच्चत्तम तापमान व नीचांक तापमानामुळे पिकाचे नुकसान झाल्यास भरपाई देण्यात येते. विमा कंपन्यांनीही झाडावरील पिकाचे झालेले नुकसान याची नोंद घेत शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची आवश्यकता आहे. वास्तविक विमा कंपन्यांकडून चुकीचे निकष लावण्यात येत असल्याने कित्येक शेतकऱ्यांनी फळपीक विमा घेतलेला नाही. त्यामुळे संबंधित शेतकरी नुकसानभरपाईच्या रकमेपासून वंचित राहणार आहेत.
दरवर्षी हवामानातील ऐनकेन बदलामुळे आंबा उत्पादन धोक्यात येत आहे. गेल्या पंचवीस वर्षांत आंबा उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. यावर्षी आखाती प्रदेश, लंडनमध्ये आंब्याला चांगली मागणी होती त्यामुळे दर टिकून होते. कोरोनामुळे विमानसेवा बंद झाल्यामुळे निर्यात बंद झाल्याने वाशी मार्केटमधील दर गडगडले. खतव्यवस्थापनापासून बाजारात विक्रीसाठी आंबा येईपर्यंत येणारा खर्च सुद्धा वसूल न झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात आले आहेत.
-------------------
यावर्षी नैसर्गिक बदलामुळे आंबा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यातच शेवटचा आंबाही वादळामुळे नष्ट झाल्याने शेतकऱ्यांची वित्त हानी प्रचंड आहे. याबाबत लोकप्रतिनिधी, प्रशासनाने दखल घेत आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी नुकसानभरपाई जाहीर करावी. आंबा उत्पादकांचे कर्ज माफ करण्यात यावे.
- राजन कदम, आंबा बागायतदार, रत्नागिरी.