रत्नागिरी : कोरोनामुळे लाॅकडाऊन सुरू आहे. अत्यावश्यक सेवेंतर्गत एस.टी.ची सेवा सुरू आहे. मात्र,भारमानाअभावी उत्पन्नावर परिणाम झाला आहे. तौक्ते वादळामुळे रविवारी सर्वत्र कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नागरिकांनीही घराबाहेर पडणे टाळले. त्यामुळे रविवारी व सोमवारी एस.टी.ची सेवा विस्कळीत होती. मंगळवारपासून पूर्ववत होण्याची शक्यता आहे.
लाॅकडाऊनपूर्वी दैनंदिन ६०० गाड्यांमधून ४ हजार २०० फेऱ्यांद्वारे एक लाख ८० हजार किलोमीटर वाहतूक करण्यात येत असे. त्यामुळे ४८ ते ५० लाखांपर्यंत उत्पन्न प्राप्त होत होेते. मात्र, लाॅकडाऊन घोषित झाल्यानंतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, अधिकारी यांच्या वाहतुकीसाठी एस.टी वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. नागरिकांनीही अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. ५० टक्के प्रवासी क्षमतेने वाहतूक सुरू ठेवण्यासाठी परवागी असली तरी प्रत्यक्ष भारमान अत्यल्प असल्याने उत्पन्नावर परिणाम झाला आहे.
तौक्ते चक्रीवादळामुळे रविवारी सकाळी काही प्रमाणात एस.टीच्या बसेस सुरू होत्या. मात्र, दुपारनंतर वादळाचा प्रभाव वाढल्यानंतर दापोली, राजापूर, गुहागर, रत्नागिरी आगारातील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. सोमवारी सकाळपर्यंत बससेवा बंद होती. रविवारी दिवसभरात २९१९ किलोमीटर वाहतूक करण्यात आली. जेमतेम ४२ फेऱ्या सोडण्यात आल्याने ५० हजार इतकेच उत्पन्न प्राप्त झाले असले तरी ४५ लाख ५० हजाराचा तोटा सोसावा लागला आहे. सोमवारी दुपारपर्यंत पाऊस, वारा सुरू होता. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळले होते. प्रवासी प्रतिसाद नसल्यामुळे सोमवारीही एस.टी वाहतूक विस्कळीत होती. मात्र, मंगळवारपासून एस.टी सेवा पूर्ववत होईल, असे एस.टी .प्रशासनाकडून सांगण्यात आले. वादळामुळे रत्नागिरी आगारातील संरक्षक भिंत कोसळली असून देवरूख आगारातील पत्रे उडाले असल्याने नुकसान झाले आहे. याबाबत पंचनामे सुरू होते.