रत्नागिरी : मुली व महिलांच्या छेडछाडीला आळा बसावा, याकरिता जिल्हा पोलीस अधीक्षक प्रणय अशोक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय दामिनी पथकाने आॅगस्टमध्ये १२९ जणांवर धडक कारवाई करीत २३ हजार ७०० रूपयांचा दंड वसुल केला आहे.
आॅगस्ट २०१७मध्ये दामिनी पथकाने एकूण १२९ जणांवर कारवाई केली. यामध्ये मोटार वाहन अधिनियम अन्वये २४ जणांवर, मुंबई पोलीस कायद्यान्वये केलेली ३५ जणांवर, सक्त ताकीद देऊन सोडलेल्या ७० जणांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून एकूण २३,७०० रूपये इतका दंड वसूल करण्यात आला.
महिला व शाळकरी मुलींची छेडछाड व विनयभंग यांसारख्या गुन्ह्यास प्रतिबंध करण्यासाठी तसेच यावर प्रभावी नियंत्रण आणून महिला व मुलींना सुरक्षित वातावरण मिळावे, यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक प्रणय अशोक व अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक शिरीष सासने, पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एस. ए. यादव (जिल्हा महिला सुरक्षा विशेष कक्ष) यांच्या नेतृत्त्वाखाली ६ कर्मचाºयांचे जिल्हास्तरीय दामिनी पथक कार्यान्वित करण्यात आलेले आहे. या पथकाकडून साध्या वेशात जाऊन अशा रोमिआेंना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाते.