रत्नागिरी : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका तोंडावर आल्याने ग्रामीण भागामध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. नाचणे आणि हरचिरी जिल्हा परिषद गटांमध्ये कोणाची वर्णी लागणार, याकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. तालुक्यातील नाचणे आणि हरचेरी जिल्हा परिषद गटांमध्ये इच्छुकांच्या मोर्चेबांधणीला वेग आला आहे. शहरालगतचा नाचणे आणि हरचेरी या दोन्ही गटांमध्ये राजकीय हालचाली वाढल्या आहेत. दोन्ही गटांमध्ये शिवसेना मजबूत असल्याने जो उमेदवार असेल तो १०० टक्के निवडून येणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी जोरदार प्रयत्न सुरु आहेत. नाचणे गटामध्ये नवा-जुना वाढ पुढे येण्याची शक्यता जास्त आहे. या गटातून पंचायत समितीचे माजी सभापती प्रकाश लाड आणि पंचायत समितीचे माजी सदस्य राजेश पालेकर यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. यापूर्वी नाचणे गट महिला असल्याने त्यामधून शिवसेनेच्या विनया गावडे निवडून आल्या होत्या. गावडे यांच्या अभ्यासू, क्रीयाशीलतेमुळे या गटात विकासाची अनेक कामे मार्गी लागली आहेत. त्यामुळे या गटात शिवसेनेशिवाय पर्याय नाही, असे जाणकारांचे मत आहे. माजी सभापती प्रकाश रसाळ यांनी यापूर्वी राष्ट्रवादीमध्ये काम केले होते. त्यांनी आमदार उदय सामंत यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर ते आता पुन्हा शिवसैनिक म्हणून कार्यरत आहेत. मात्र, त्यांची ताकद फारसी या गटात आता राहिलेली दिसत नाही. त्यातच त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर शिवसेनेतील अनेकांनी त्यांच्यावर टिकास्त्र केले. नाचणे गटात पक्षाशी निष्टा असणाऱ्यांनी दुसऱ्या पक्षात जाऊन पुन्हा सेनेत प्रवेश केला. त्यामुळे या गटात नाराजीचा सूर जोरात आहे. राजेश पालेकर हे शिवसेनेतील सक्रीय कार्यकर्ते आहेत. या दोघांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. शिवसेनेमध्ये पक्ष देईल त्या उमेदवाराला निवडून देण्यासाठी शिवसैनिक अहोरात्र मेहनत घेतात. पालेकर हे इच्छुक असले तरी पक्ष देईल तो आपला उमेदवार असेल, त्यासाठी आपण काम करणार असल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे. असे असले तरी यावेळी रसाळ की, पालेकर यांच्यापैकी एकाला संधी मिळते, की तिसऱ्याच कोणाची वर्णी लागते, याकडे लक्ष लागले आहे. हरचेरी गटात समाजकल्याण सभापती देवयानी झापडेकर आणि सदस्या विनया गावडे यांच्या नावाची चर्चा आहे. झापडेकर या मागील निवडणुकीत गोळप गटातून, तर गावडे या नाचणेतून विजयी झाल्या होत्या. झापडेकर यांचे पती महेंद्र झापडेकर हे पंचायत समिती सदस्य आहे. ते यापूर्वी झालेल्या पंचायत समिती सभापतीपदाच्या शर्यतीत होते. त्याचबरोबर विनया गावडे यांचे नावही जिल्हा परिषदेच्या सभापतीपदासाठी चर्चेत होते. पंचायत समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत आमदार समर्थक महेश म्हाप यांची सभापतीपदी वर्णी लागली. त्याबदल्यात देवयानी झापडेकर यांना जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापतीपद देण्यात आले. झापडेकर यांची सभापतीपदी वर्णी लागल्याने यावेळी गावडे यांना संधी देण्यात येईल, अशी शक्यता आहे. हरचेरी गणावर आणि जिल्हा परिषद गटावरही महिला आरक्षण पडल्याने महेंद्र झापडेकर हे निवडणूक रिंगणातून बाजूला गेले. तसेच गावडे यांचा नाचणे गट सर्वसाधारण झाल्याने त्यांच्यासमोर पर्याय म्हणून हरचेरी गट आहे. त्यामुळे यावेळी या गटातून झापडेकर की, गावडे यापैकी कोणाला रिंगणात उतरवले जाते, याकडे तालुक्याचे लक्ष आहे. मात्र, नाचणे आणि हरचेरी जिल्हा परिषद गटात राजकीय बैठकांना जोर चढला आहे. (शहर वार्ताहर) ४जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांचे पडघम. दोन्ही गटात शिवसेना मजबूत असल्याने उमेदवार निवडून येण्याची शक्यता. हरचेरी गणावर आणि गटात महिला आरक्षण पडल्याने अनेकांचा हिरमोड. इच्छुक उमेदवार महेंद्र झापडेकर यांना मतदार संघाचा शोध. वादाचा फटका रत्नागिरीत तालुक्यातील नवा - जुना वाद संपुष्टात आलेला नाही. या वादामुळे पक्षांतर्गत कुरघोडीला चालना मिळाली आहे. राजकीय नेतेमंडळी तो भासवू देत नसले तरी अंतर्गत द्वेषाची ठिणगी विझलेली नाही. त्याचा परिणाम निवडणुकीवर होण्याची शक्यता आहे. पक्षांतर्गत प्रवेशदेखील वाढणार आहेत.
नाचणे, हरचेरी गटात मोर्चेबांधणी
By admin | Published: October 09, 2016 11:40 PM