लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : शहरातील परकार कॉम्प्लेक्स परिसरातील परकार प्लाझा इमारतीच्या मागील बाजूस शिवनदीलगत असलेली संरक्षक भिंत कोसळल्याने या इमारतीला धोका निर्माण झाला आहे. या इमारतीत आठ सदनिकाधारक असून, त्यांना नगर परिषदेने नोटीस बजावली आहे. त्यामुळे आता येथील रहिवाशांपुढे प्रश्न निर्माण झाला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून परकार प्लाझा इमारतीच्या मागील बाजूस तडे गेले होते. त्यामुळे येथील रहिवाशांनी संबंधित बांधकाम व्यावसायिकाकडे संरक्षक भिंत दुरुस्तीची मागणी केली होती. मात्र, आता या इमारतीतील रहिवाशांची सोसायटी स्थापन झाल्याने बांधकाम व्यावसायिकाने त्यांच्या मागणीची दखल घेतली नाही. त्यानंतर येथील रहिवाशांनी नगर परिषदेकडे मदत मागितली. ही खासगी मालमत्ता असल्याने नगर परिषदेनेही हात वर केले आहेत. त्यानंतर आता नुकत्याच झालेल्या पावसात ही संरक्षक भिंत कोसळली असून, त्यापासून संपूर्ण इमारतीला धोका निर्माण झाला आहे.
परकार प्लाझा सी विंग या इमारतीच्या मागील बाजूस अगदी लागून शिवनदी वाहते. पावसाळ्यात या नदीला मोठ्या प्रमाणात पाणी येते. त्यामुळे ऐन पावसाळ्यात या इमारतीला मोठा धोका उदभवू शकतो. इमारतीपासून अवघ्या दहा फुटावर नदी पात्र आहे. त्यातील काही भाग आताच खचला आहे. तसेच काही ठिकाणी भेगाही गेल्या आहेत. त्यामुळे यावर वेळीच उपाययोजना करणे आवश्यक असल्याची मागणी येथील रहिवाशांमधून केली जात आहे.
--------------------------
चिपळूण शहराच्या खेंड विभागातील परकार प्लाझा सी विंग या इमारतीच्या मागील बाजूस संरक्षक भिंत कोसळल्याने धोका निर्माण झाला आहे. (छाया : संदीप बांद्रे)