चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावर वसलेल्या पेढे परशुराम येथील घाटात सुरू असलेल्या चौपदरीकरणाच्या कामामुळे तब्बल ७१ कुटुंबांना दरडीचा धोका निर्माण झाला आहे. त्यापैकी ४८ जणांना महसूल विभागाकडून तात्पुरत्या स्थलांतराच्या नोटीस बजावल्या होत्या. मात्र, शनिवारी रात्री या घाटात दरड कोसळल्याने ऐन पावसाळ्यात १० कुटुंबांवर स्थलांतर करण्याची वेळ आली आहे. काहीजण नातेवाईकांच्या घरी, तर काहीजण भाड्याच्या खोलीत राहत आहेत.
परशुराम घाटाच्या चौपदरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. डोंगराच्या कटाईचे काम अजूनही बाजूने काही ठिकाणी सुरू आहे. मात्र, या डोंगर कटाईमुळे घाटमाथ्यावर व पायथ्यालगत असलेल्या वस्तीला मोठा धोका निर्माण झाला आहे. या घाटातील सुमारे ४०० मीटर लांबीचा दरडग्रस्त भाग अतिशय धोकादायक बनला असून, या कामामुळे पेढे परशुरामवासीय भीतीच्या छायेत आहेत. महिनाभरापूर्वी तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांच्यातर्फे पेढे परशुराम येथील ४८ दगडग्रस्त कुटुंबांना नोटीस बजावण्यात आल्या होत्या. त्यापाठोपाठ पेढे व परशुराम या दोन्ही ग्रामपंचायतीत आढावा बैठकही घेतली होती.
महिनाभरापूर्वी ठेकेदार कंपनीला तत्काळ डोंगराच्या बाजूने संरक्षक भिंतीचे काम सुरू करण्याची सूचना केली होती. त्यानंतर बेंचिंग पद्धतीने डोंगर कटाईचे काम सुरू होते परंतु आता पावसाने जोर घेतल्यामुळे कामाची गती खूपच मंदावली आहे. त्यातच शनिवारी रात्री घाटाच्या मध्यवर्ती ठिकाणी दरड कोसळली. मात्र, घटनेमुळे घाट माथ्यावर व पायथ्याशी असलेल्या वस्तीतील १० कुटुंबांना रात्रीच स्थलांतरित केले. या घटनेमुळे तब्बल ४८ कुटुंबांना स्थलांतर करावे लागणार आहे. त्याबाबत प्रशासनाकडून दोन्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून प्रक्रिया सुरू केली आहे. या गावचे तलाठी भारत जाधवर यांनी सांगितले की, तीन-चार कुटुंबांची रात्रीच्यावेळी शाळेत व्यवस्था केली असून, उर्वरित कुटुंब त्यांच्या नातेवाईकांकडे राहत आहेत.