रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य चौथ्या वित्त आयोगाचे अध्यक्ष जे.पी.डांगे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत जिल्ह्यातील सर्व नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या वित्तीय नियोजनाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी संबधित संस्थांना येणाऱ्या समस्यांची आणि त्यांना आवश्यक असणाऱ्या निधीची माहिती घेतली.शहरातील पायाभूत सुविधांचे वस्तुनिष्ठ विश्लेषण करावे. सांडपाणी व्यवस्था, रस्ते, इमारत आणि स्ट्रीट लाईट दुरुस्तीसाठी आवश्यक निधीची माहिती एकत्रित करण्यात यावी. शहरातील मोकाट जनावरांचा वाढता त्रास लक्षात घेऊन त्यावर उपाययोजना आखण्यावर लक्ष द्यावे, याकरिता आवश्यक असणाऱ्या निधीसाठीचा आराखडा तयार करण्यात यावा. दरवर्षीचे उत्पन्न आणि आवश्यक निधीची विश्लेषणात्मक माहिती आयोगाकडे विहित नमुन्यात सादर करावी, अशा सूचना त्यांनी केल्या. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांशी विकासकामांच्या क्रियान्वयनाबाबत आवश्यक बाबींविषयी चर्चा केली.बैठकीला जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., निवासी उपजिल्हाधिकारी एस. आर. बर्गे, जिल्हा प्रशासकीय अधिकारी जयंत जावडेकर तसेच सर्व नगरपालिकांचे मुख्याधिकारी आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
डांगे यांनी घेतला पालिकांचा आढावा
By admin | Published: September 07, 2014 12:30 AM