रत्नागिरी : कुर्धे (ता. रत्नागिरी) येथील ग्रामस्थ संतोष चव्हाण यांच्या पडक्या विहिरीत गुरूवारी दुपारी पडलेल्या बिबट्या आश्चर्यकारकरित्या बाहेर पडताना वन विभागाचे कर्मचारी आणि ग्रामस्थांना चकवा देत पळ काढला.
कुर्धेतील पडक्या विहिरीत गुरूवारी दुपारच्या सुमारास बिबट्या पडला. या परिसरात वारंवार बिबट्याचे दर्शन ग्रामस्थांना होत असते. काही दिवसांपूर्वीच गावात वासरावर या बिबट्याने हल्ला केला होता. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये या बिबट्याची दहशत पसरली आहे.
गुरूवारी दुपारी लोकवस्तीपासून काहीशा दूर अंतरावर असलेल्या पडक्या विहिरीतून बिबट्याच्या गुरगुरण्याचा आवाज येऊ लागला. ग्रामस्थांनी जाऊन पाहिले असता, विहिरीच्या घळीत बिबट्या अडकून पडल्याचे दिसून आले. ही माहिती वन विभागालाही देण्यात आली.
बिबट्या विहिरीत पडल्याची माहिती मिळताच पालीचे वन अधिकारी एम. एस. गुरव, डोईफोडे आणि अन्य कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. पावसामुळे विहिरीच्या आजूबाजूला झुडपे वाढलेली होती. त्यातच विहिरीला संरक्षक कठडा नसल्याने पिंजरा लावून बिबट्याला बाहेर काढणे अडचणीचे होत होते. विहीर अरूंद असल्याने पिंजराही लावता येत नव्हता. अखेर सायंकाळी हे प्रयत्न थांबविण्यात आले.
मात्र, विहिरीत लोखंडी शिडी लावून ठेवण्यात आली होती. दरम्यान, शुक्रवारी सकाळी रत्नागिरी परिक्षेत्राचे वन अधिकारी बी. आर. पाटील, पालीचे वनरक्षक एम. एस. गुरव तसेच देवरूखमधील ४, लांजामधील २, राजापूरचे एक वनरक्षक त्याठिकाणी गेले. मात्र, तिथे बिबट्याची काहीच चाहुल लागेना. त्यामुळे अधिकाºयांनी पिंजºयातून एका कर्मचाºयाला खाली पाठवले असता, या शिडीवर चढून बाहेर आलेल्या बिबट्याने या साºयांनाच चकवा देत तेथून पलायन केले. या मोहिमेत ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.