दापोली : तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात वादळी वारे वाहात असून, चक्रीवादळापूर्वी समुद्रात नैसर्गिक बदल पाहायला मिळत हाेते. समुद्रामधील अजस्त्र लाटांचा फटका समुद्रकिनाऱ्यावरील घरांना बसत आहे. वादळापूर्वीच प्रशासनाने लोकांना स्थलांतरित केले असून, महावितरण कंपनीनेही वीज पुरवठा खंडित केला हाेता.
तालुक्यातील दाभोळ, हर्णै, केळशी, उटंबर, बुराेंडी या सर्वच बंदरातील बोटी किनाऱ्यावर बोलावण्यात आल्या आहेत. या बाेटी बंदरात नांगर टाकून उभ्या आहेत. दापोली तालुक्यातील अनेक गावातील समुद्र किनाऱ्यालगत असणाऱ्या धोकादायक वस्तीला सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. त्यामुळे जीवितहानीचा धोका टळला आहे. जिल्हा प्रशासनातर्फे तालुक्यातील आपत्ती व्यवस्थापन सतर्क करण्यात आले असून, ग्रामपंचायत पातळीवर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तयार करण्यात आली आहे. तालुक्यातील अनेक गावांना अतिवृष्टीचा फटका बसण्याची शक्यता असल्याने तालुका प्रशासन किंवा जिल्हा प्रशासन यांच्याकडून आपत्ती काळात मदतीसाठी काही नंबरसुद्धा प्रसिद्ध केले आहेत.