दापोली / शिवाजी गोरे : दापाेली काेकण कृषी विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या दीपाली चव्हाण यांनी स्वत:वर गाेळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना २५ मार्च राेजी सायंकाळी ७.३० वाजता घडली आहे. सध्या त्या अमरावती जिल्ह्यातील मेळघाटच्या व्याघ्र प्रकल्पातील हरिसाल येथे आरएफओ पदावर कार्यरत हाेत्या. त्याच्या आत्महत्येच्या वृत्ताने अनेकांना धक्का बसला असून, त्यांच्या आत्महत्येचे कारण मात्र अद्यापही स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, पाेलिसांना सुसाईट नाेट सापडली असून, त्यामध्ये काय लिहिले आहे ते कळू शकलेले नाही.
दीपाली चव्हाण यांचे वडील दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात कार्यरत होते. कोकण कृषी विद्यापीठातून २०११ राेजी आपलं पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून दीपाली चव्हाण २०१५ साली महाराष्ट्र वनसेवेची परीक्षा उत्तीर्ण झाल्या हाेत्या. कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची ख्याती होती. दीपाली चव्हाण यांचे दोन वर्षांपूर्वी जिल्हा कोषागार कार्यालयातील राजेश मोहिते यांच्यासोबत विवाह झाला होता. त्या आपल्या संसारात अतिशय सुखी आणि खूश होत्या. त्यांनी अचानकपणे स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
२५ मार्च २०२१ रोजी सायंकाळी त्यांच्या निवासस्थानातून गोळी झाडल्याचा आवाज आला. त्यावेळी आजूबाजू असलेले नागरिक, वनविभागाचे कर्मचारी त्यांच्या निवासस्थानाकडे धावले. रक्ताच्या थारोळ्यात दीपाली चव्हाण यांना पडलेलं पाहून त्यांना धक्काच बसला. त्यानंतर तातडीनं पोलीस घटनास्थळी दाखल होऊन दीपाली चव्हाण यांचा मृतदेह ताब्यात घेतला. पोलीस उपअधीक्षक संजय काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास कुलकर्णी पुढील तपास करत आहेत.
चाैकट
पालकांचा ठिय्या
दीपाली यांचे शव विच्छेदनासाठी अमरावती येथे आणले असता वनक्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी व विनोद शिवकुमार यांच्यावर जोपर्यंत गुन्हे दाखल होत नाही व त्यांना अटक होत नाही तोपर्यंत दीपाली चव्हाण यांचा मृतदेह आम्ही ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका त्यांच्या कुटुंबीयांनी घेतली हाेती. त्याचबराेबर काही वन कर्मचारी अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या शवविच्छेदनगृहाबाहेर ठिय्या मांडून बसले हाेते.
चाैकट
संशयित ताब्यात
दीपाली चव्हाण यांना डीएफओ विनाेद शिवकुमार याने प्रवृत्त केल्याचा संशय पाेलिसांना आहे. या संशयावरून अमरावती गुन्हे शाखेच्या पथकाने नागपूर - बेंगलाेर राजधानी एक्स्प्रेसमधून जात असताना त्याला ताब्यात घेतले आहे. याबाबत पाेलिसांनी अद्याप काेणतीच माहिती दिली नसून अधिक तपास सुरू आहे.