दापोली : सेवेत कायम केले जावे, या मागणीसाठी उपोषण करणाºया डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ श्रमिक संघटनेच्या १२ जणांना प्रकृती ढासळल्याने दापोली उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यातील तीन महिलांची प्रकृती गंभीर आहे.
गेली २०-२२ वर्षे अस्थायी कामगार म्हणून विद्यापीठात काम करणाºयांना सेवेत कायम करावे, अशा मागणीसाठी विद्यापीठाच्या श्रमिक कामगार संघटनेने सोमवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. तत्कालीन कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी अस्थायी कामगारांना कायम करण्याचा निर्णय घेतला होता. १५ जुलै २०१५ रोजी ज्यांनी अस्थायी कामगार म्हणून पाच वर्षे काम केले आहे, अशा लोकांना कायम करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र या निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही. त्याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारपासून उपोषण सुरू करण्यात आले आहे. या उपोषणात २८५ कामगार सहभागी झाले आहेत. गेली २२ ते २५ वर्षे हे कामगार अस्थायी स्वरुपात कृषी विद्यापीठात काम करत आहेत. २००८मध्ये लागलेल्या कर्मचाºयांना कायम करण्यात आले मग आम्हाला का कायम केलेले नाही? असा सवाल या कर्मचाºयांनी केला आहे.