दापोली : तालुक्यातील दाभोळ भारती शिपयार्ड कंपनीने ठेकेदारांचे कोट्यवधी रुपयांचे देयक थकविले आहे. ते मिळावे, या मागणीसाठी कंपनीच्या ठेकेदारांनी दापोलीतहसीलदार कार्यालयासमोर एक दिवसाचे उपोषण केले.भारती शिपयार्ड, उसगाव दाभोळ कंपनीमध्ये सिव्हिल फॅब्रिकेशन, वॉटर सप्लायर, खडी रेती सप्लायर, व्हेजीटेबल सप्लायर, इंटेरियर सप्लायर, लेबर सप्लायर आदी कामे करणाऱ्या ठेकेदारांचे सुमारे पाच कोटी रुपये भारती शिपयार्ड कंपनीकडून येणे बाकी आहेत.
थकलेली देयके मिळावीत, यासाठी ठेकेदारांनी कंपनीकडे वारंवार पाठपुरावा केला. मात्र कोणतेही ठोस उत्तर दिले जात नाही. त्यामुळे हताश झालेल्या ठेकेदारांनी शेवटी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. त्यानुसार बुधवारी कंपनी विरोधात ६५ ठेकेदारांनी एक दिवसाचे उपोषण केले.भारती शिपयार्ड कंपनी दुसऱ्या कंपनीकडे हस्तांतरीत झाली आहे. परंतु नवीन कंपनीने जुन्या कंपनीकडे बोट दाखवले आहे. त्यामुळे थकलेली देयके कोणाकडे मागायची, अशा संभ्रमात ठेकेदार पडले आहेत.
वारंवार विनंती करूनही कंपनी देयकासंदर्भात कोणतीही हालचाल करत नसल्याने अखेर कंपनीविरोधात कोर्टात दाद मागण्याचा निर्णय या ठेकेदारांनी घेतला आहे. दापोलीच्या तहसीलदार वैशाली पाटील यांच्याकडे ठेकेदार संघटनेने एक निवेदन देऊन प्रशासनाने ठेकेदारांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी केली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय कदम यांनी ठेकेदारांच्या उपोषणाला पाठिंबा दिला असून, स्थानिक ठेकेदारांचे पैसे मिळत नाहीत तोपर्यंत आपण पाठपुरावा करत राहू तसेच या ठिकाणच्या भूमिपुत्रांना न्याय मिळाला पाहिजे. कामगारांचे थकलेले पगार, ठेकेदारांचे देयकही मिळाले पाहिजे, अशी आपली भूमिका आहे. आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आपण पाठपुरावा करू तसेच कामगारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू, असेही ते म्हणाले.आत्महत्या करण्याची वेळदेयक न मिळाल्यामुळे ठेकेदार अत्यंत अडचणीत आले आहेत. देयके तत्काळ मिळाली नाहीत तर आम्हाला आत्महत्या करावी लागेल, अशा स्वरूपाची भूमिका या ठेकेदारांनी तहसीलदार वैशाली पाटील यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत मांडली. यावर तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.