शिवाजी गोरेदापोली : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील मुरुड समुद्र किनाऱ्यावरील वादग्रस्त साई रिसॉर्ट प्रकरणी माजी मंत्री अनिल परब चांगलेच अडचणीत आले आहेत. सत्तात्तंर होताच रिसॉर्ट पाडण्याचे आदेश, नंतर परबांसह तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. यानंतर दापोली न्यायालयाने आता समन्स जारी केले आहेत. पर्यावरण संरक्षण कायदा कलम-१५ अन्वये हे समन्स जारी करण्यात आले आहेत. याप्रकरणी १४ डिसेंबरला सुनावणी होणार असून त्यास हजर राहण्याचे आदेश देण्यात आल्याने अनिल परबांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.१४ डिसेंबर रोजी होणाऱ्या सुनावणीला हजर राहण्याचे आदेश दिल्याने अनिल परबांना न्यायालयात हजर राहावे लागणार आहे. यापूर्वी अनिल परबांनी शासकीय कामकाजाचे कारण देत एकदाही कोर्टाच्या तारखेला हजर राहिले नव्हते. मात्र, आता न्यायालयाने समन्स बजावल्याने हजर राहावे लागणार आहे.दापोली न्यायालयात केंद्रीय पर्यावरण विभागाच्यावतीने दाखल करण्यात आलेल्या खटल्यावर आज, बुधवारी सुनावणी झाली. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अनिल परब यांच्याविरोधात केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने खटला दाखल केला आहे. अँड प्रसाद कुवेसकर यांनी पर्यावरण विभागाच्यावतीने युक्तीवाद केला.यातच, भाजप नेते किरीट सोमय्या याप्रकरणाच्या पाठपुराव्यासाठी शुक्रवारी (दि.११) रत्नागिरी दौऱ्यावर येणार आहेत. साई रिसॉर्ट हे अनिल परबांच्या मालकीचेच असल्याचा सोमय्यांचा आरोप आहे.
दापोली न्यायालयाकडून अनिल परबांसह तिघांविरोधात समन्स जारी, सुनावणीला हजर राहण्याचे दिले आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2022 6:09 PM