दापाेली : तालुक्यातील आंजर्ले जवळील मुर्डी येथील विनय जोशी या कृषी पदवीधर तरुणाने चहा लागवडीचा उपक्रम राबविला आहे. त्याच्या या उपक्रमामुळे आता कोकणातही चहा लागवडीचा उपक्रम यशस्वी होणार आहे.
या लागवडीबाबत माहिती देताना विनय जोशी यांनी सांगितले की, २०२० च्या भीषण निसर्ग वादळानंतर दापोली तालुक्याचा बराचसा बंदर पट्टा (किनारी भाग) उद्ध्वस्त झाला. नारळ, सुपारी, फणस, कोकम, आंबा बागा डोळ्यादेखत आडव्या झाल्या. एकेकाळच्या भरगच्च, हिरव्यागार बागांची मोकळी मैदाने झाली. अनेकांनी नारळ, सुपारीच्या बागा परत उभ्या करायला घेतल्या पण आम्ही बागेला दोन वर्षे विश्रांती दिली. नवीन काही करण्याचा विचार करत असतानाच आसामचा चहा डोळ्यासमोर आला. आसाममधील पीकपाणी, झाडं, फळं आणि लहान सहान तण सुद्धा कोकणात उगवते. आसाम आणि कोकण यांच्यामधील भाैगाेलिक परिस्थिती एकसारखीच असल्याचे जाणवले. त्यामुळे लागवडीसाठी आसाममधून चहाची रोपे आणली व ती मुर्डी येथील बागेत लावली आहेत. नोव्हेंबर २०२२ पासून वाफा पद्धतीने लागवड सुरु केली होती. दोन महिन्यांपूर्वी ही लागवड पूर्ण झाली. आता ही रोपे आपल्या मातीत स्थिरावली आहेत. वर्षभरातल्या रोपांच्या कामगिरीवरून चहा इथे चांगला तग धरून एक पीक म्हणून पुढे येईल, अशी खात्री वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.
नवीन पर्यायी पीकसलग काही वर्षे नियमितपणे वर्षभर पडणारा पाऊस आणि त्यामुळे कोकणचं सोनं हापूस आंबा याची दरवर्षी दैना होत आहे. त्याला पर्याय म्हणून आतापासूनच काही पर्यायांवर विचार आणि प्रयोग सुरू केल्यास एखादी नवी पीक पद्धती हाती लागेल त्यादृष्टीने चहा हा एक प्रयोग आहे.
हा एक याेगायाेग२००२ मध्ये मी गारो हिल्स, मेघालयात संघाचा प्रचारक असताना माझे बाबा (विनायक जोशी) स्व. मुकुंदराव पणशीकर, जयंतराव यांच्या सोबत तिथे आले होते. बाबा चहा भक्त होते आणि ‘चाय बागान’ बघायची त्यांना तीव्र इच्छा होती. काही कारणामुळे तिथे जाणं शक्य झालं नाही. यानिमित्ताने ज्या जागेत आमच्या बाबांनी नारळ, पोफळीची बाग फुलविली होती, ती वादळात नष्ट झाली होती. आता तेथेच ‘चाय बागान’ उभी राहत आहे, असे विनय जोशी म्हणाले.