दापोली : तालुक्यामधील विसापूर येथून एकाच कुटुंबातील बेपत्ता झालेल्या चौघांपैकी तिघांना शोधण्यात दापोली पोलिसांना यश आले आहे. अपहरण म्हणून दाखल झालेल्या दोन्ही मुलांना शोधण्यात पोलिसांना यश आल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मात्र, या कुटुंबातील भरत भेलेकर यांचा अजून शोध लागलेला नाही.३ जुलै रोजी मुलांच्या अपहरणाची तर सुगंधा बेपत्ता झाल्याची तक्रार दापोली पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. एकाच कुटुंबातून चौघे जण बेपत्ता झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात या प्रकरणाने खळबळ माजली होती. दापोली पोलिसांनी सर्व पोलिस ठाण्यांत याची माहिती दिली होती. त्यानुसार गुप्त माहितीच्या आधारे सुगंधा भेलेकर ही ठाणे परिसरात दोन मुलांसमवेत असल्याची माहिती उपलब्ध झाली. त्यानुसार दापोलीचे पोलिस अंमलदार विकास पवार यांनी ठाणे येथे या तिघांवर नजर ठेवण्यासाठी सापळा रचला होता.सकाळी ठाणे दापोली या बसमध्ये हे तिघे जण बसल्याचे सूत्रांकडून विकास पवार यांना समजले. त्यानुसार त्यांनी सदर गाडीचा बसचालक व वाहक यांचे तत्काळ नंबर मिळवून कोणतीही शंका येणार नाही, याची काळजी घेऊन या तिघांवर लक्ष ठेवण्याबाबत सांगितले. सदर गाडी पालगड या ठिकाणी आली असता हे तिघे जण गाडीतून उतरल्याचे समजले.या गाडीच्या पाठोपाठ विकास पवार व त्यांचे अन्य साथीदार असल्याने या तिघांना ताब्यात घेऊन दापोली पोलिस ठाण्यात आणण्यात आले. या प्रकरणात पोलिस अंमलदार विकास पवार तसेच पोलिसमित्र, पालगड येथील ग्रामस्थ तसेच अक्षय पवार, अनिकेत शिंदे, समीर जाधव, सुरेश शिंदे, सुयोग मोरे, एसटीचे कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केल्याचे पोलिस अंमलदार विकास पवार यांनी सांगितले आहे.
बेपत्ता कुटुंबातील तिघांना शोधण्यात दापोली पोलिसांना यश, एकाचा शोध सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2023 5:22 PM