दापोली : दापोली नगरपंचायत निवडणुकीत आपले पारंपरिक मित्र बाजूला ठेवून शिवसेना व काँग्रेसने सत्तेसाठी नवे समीकरण जुळवले आहे. सोमवारी झालेल्या निवडणुकीत नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या उल्का जाधव, तर उपनगराध्यक्षपदी काँग्रेसच्या रजिया रखांगे विजयी झाल्या.दापोली नगरपंचायतीतील शिवसेनेचे ७, भाजपचे २, तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे प्रत्येकी ४ सदस्य निवडून आले. बहुमतासाठी अपेक्षित असलेला ९ हा आकडा कोणत्याही एका पक्षाकडे नव्हता. त्यामुळे सत्तेचे कोडे सुटणार कसे, हा प्रश्न होता. अचानक दापोली शिवसनेने एक पाऊल पुढे टाकत काँग्रेसकडे आघाडीचा प्रस्ताव ठेवला. काँग्रेसला उपनगराध्यक्षपद व दोन समित्या देण्याची तयारी दर्शवली. शिवसेनेचा प्रस्ताव काँग्रेसने मान्य केला व दापोलीच्या इतिहासात नवी समीकरणे जुळली.नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या उल्का जाधव यांचे नाव पुढे आले. उल्का जाधव यांना शिवसेनेची सात आणि काँग्रेसची चार अशी ११ मते मिळाली. राष्ट्रवादीतर्फे नम्रता शिगवण आणि भाजपच्या जया साळवी यांनीही नगराध्यक्षपदासाठी नामनिर्देशन भरले होते. नम्रता शिगवण यांना चार मते मिळाली. भाजपचे दोन्ही नगरसेविका या निवडीप्रसंगी गैरहजर होत्या. उपनगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे नगरसेवक सचिन जाधव यांनी नामनिर्देशन पत्र भरले होते. परंतु त्यांना ४ मते मिळाली. काँग्रेसच्या उपनगराध्यक्षपदाच्या उमेदवार रजिया रखांगे यांना ११ मते मिळून त्या निवडून आल्या. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी जयराम देशपांडे तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मुख्याधिकारी संजीवनी दळवी यांनी काम पाहिले. नगराध्यक्षपदाच्या निवडीकरिता उल्का जाधव, खालीद रखांगे, रजिया रखांगे, रवींद्र क्षीरसागर, प्रकाश साळवी, परवीन रखांगे, परवीन शेख, नम्रता शिगवण, प्रशांत पुसाळकर, मंगेश राजपूरकर, केदार परांजपे, कृपा घाग, शबनम मुकादम, आदी नगरसेवक उपस्थित होते. भाजपच्या जया साळवी, रमा तांबे अनुपस्थित होत्या. (प्रतिनिधी)आमदारांच्या ‘त्या’ विधानामुळे....दापोली नगरपंचायत निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. त्रिशंकू अवस्थेत भाजप किंगमेकरच्या भूमिकेत होती. राष्ट्रवादीचे आमदार संजय कदम यांनी भाजपचा नगराध्यक्ष दापोली नगरपंचायतीवर बसवू अशी प्रतिक्रिया दिली. त्यामुळे काँग्रेस दुखावली गेली. काँग्रेस-राष्ट्रवादीने निवडणूकपूर्व आघाडी केली होती. असे असताना काँग्रेसला विश्वासात न घेता दिलेली नगराध्यक्षपदाबाबतची प्रतिक्रिया काँग्रेसला झोंबली. काँग्रेस-राष्ट्रवादीचे ८ नगरसेवक होते. सत्तेसाठी त्यांना भाजपची साथ लागणार होती. परंतु भाजपला नगराध्यक्षपद देण्याची भूमिका राष्ट्रवादीने घेतल्याने काँग्रेसने शिवसेनेशी हातमिळवणी केली.दोन ‘भाई’ एकत्रशिवसेना-काँग्रेस नवे समीकरण जुळवण्यासाठी कोकणातील दोन हेवीवेट ‘भार्इं’नी पुढाकार घेतला होता. काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष आमदार भाई जगताप व शिवसेना नेते पर्यावरणमंत्री रामदासभाई कदम, हे दोन भाई दापोलीची सत्ता मिळवण्यासाठी एकत्र आले.
दापोलीत शिवसेनेला काँग्रेसची साथ
By admin | Published: December 26, 2016 11:51 PM