दापोली : आपण उज्ज्वला गॅस योजनेचे कनेक्शन देण्याकरिता आलेलो आहोत, असे सांगून दापोली तालुक्यातील अनेकांना लुटणाऱ्या टोळीचा दाभोळ पोलिसांनी नुकताच पर्दाफाश केला. ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे याप्रकरणी ६ जणांना अटक झाली आहे.शनिवारी दापोली तालुक्यातील उसगाव गणेशवाडी येथे ग्रामपंचायत सदस्य ऐश्वर्या आग्रे यांच्याकडे सहाजण आले. तुमच्याकडे गॅस कनेक्शन आहे का, अशी विचारणा त्यांनी केली. पंतप्रधानांनी सुरू केलेल्या उज्ज्वला गॅस कनेक्शनची माहिती देऊन त्यांनी सदर योजनेमध्ये आपल्याला गावामध्ये गॅस कनेक्शन येणार असल्याचे सांगितले.
आपण सरकारकडून नेमलेले कर्मचारी आहोत, असे सांगत या टोळक्याने आग्रे यांची माहिती एका फॉर्मवर लिहून घेतली. पंधरा दिवसांच्या आत सिलिंडर व नवीन शेगडी असे सरकारकडून पुरवण्यात येईल, असे सांगितले. याकरिता आग्रे यांच्याकडून ५०० रुपये घेऊन ते टोळके निघून गेले.थोड्या वेळाने आग्रे यांचा भाऊ कौस्तुभ वैद्य याने फोन केला आणि गॅस कनेक्शन देतो, असे खोटे सांगून पैसे उकळणारी माणसे गावात आली आहेत, अशी माहिती दिली. तू त्यांना पैसे किंवा कोणतीही माहिती देऊ नकोस, असेही सांगितले. यावर आग्रे यांनी थोड्या वेळापूर्वी तीच माणसे आपल्याकडे येऊन आपल्याकडून पैसे घेऊन गेल्याचे वैद्य यांना सांगितले.हा प्रकार लक्षात आल्यावर गावातील लोकांच्या मदतीने आजूबाजूच्या परिसरात शोध घेण्यास सुरुवात केली. शोध घेत असता पंचनदी येथील तारेचा खांब येथे एका स्कॉर्पिओमध्ये संगीता पवळे (नांदेड), सुनीता बादावत (चंद्रपूर), ममता डोंगरे (अकोला), अशोक जोगदंड (बीड), शामसुंदर जोंजाळ (बीड), विठ्ठल सलगर (बीड) या ६ व्यक्ती बसलेल्या आढळल्या. त्यांच्याकडे चौकशी करण्यात आली असता आपण उज्ज्वला गॅस योजनेची खोटी माहिती देत असल्याचे व लोकांकडून पैसे लबाडीने घेत असल्याचे त्यांनी कबूल केले.दरम्यान, या प्रकाराची माहिती दाभोळ पोलिसांना देण्यात आली. पोलिस तत्काळ घटनास्थळी आले. त्यांनी या सर्वांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास दाभोळ सागरी पोलिस स्थानकाच्या पोलिस निरीक्षक पूजा हिरेमठ करत आहेत.