दापोली : ग्रामस्थ व प्रशासनाने हातात हात घालून काम केले तर कोणतेही काम होऊ शकते हे दापोली तालुक्यातील आगारवायंगणी गावातील महिलांनी दाखवून दिले आहे. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ अंतर्गत ‘मिशन बंधारे २०१९’ मोहिमेत आजपर्यंत लोकसहभागातून बंधारे बांधल्याचे आपण पाहिले आहे. परंतु, आगारवायंगणी गावातील महिला मंडळ, दापोली पंचायत समितीच्या महिला कर्मचारी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी हातात हात घालून श्रमदानातून याठिकाणी बंधारा घालून मिशन बंधारे मोहिमेत महिला कुठेही कमी नसल्याचे दाखवून दिले आहे.
आगारवायंगणी गावातील महिला मिशन बंधारे मोहिमेत रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल, सहाय्यक गटविकास अधिकारी बागुल, विस्तार अधिकारी रोहिणी जाधव सहभागी झाल्या होत्या. दापोली पंचायत समितीतील महिला कर्मचारी व आगारवायंगणी गावातील महिलांनी श्रमदानातून यावेळी नदीवर बंधारा बांधला.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गोयल यांनी महिलांसमवेत श्रमदान केले. रत्नागिरी जिल्ह्यातील पहिला बंधारा महिलांनी स्वतंत्रपणे बांधला. यावेळी हातात टोपले, दगड घेऊन महिला कर्मचाºयांनी श्रमदान केले. विशेष म्हणजे हा संपूर्ण साखळी बंधारा महिलांनी बांधून महिला या क्षेत्रातसुद्धा कमी नसल्याचे दाखवून दिले.
मिशन बंधारे मोहिमेत दापोलीचे गटविकास अधिकारी डॉ. प्रशांत राऊत, जिल्हा परिषद सदस्य अनंत करंबेळे, विस्तार अधिकारी दिलीप रुके, सरपंच किसन भाताडे, उपसरपंच कोळंबे, तंटामुक्त अध्यक्ष अशोक शिगवण, ग्रामीण अध्यक्ष नितीन शिगवण, ग्रामसेविका एस. व्ही. साळुंके, ग्रामपंचायत सदस्य रोशनी भाताडे, उषा जाधव, चंद्रकला शिगवण, विद्या शिगवण, तानाजी शिगवण, किरण शिगवण, निवास जाधव, अनिल जाधव सहभागी झाले होते.
गावातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आगारवायंगणी ग्रामस्थांनी २५ वर्षांपूर्वी गावात मिशन बंधारे मोहीम हाती घेतली होती. येथील ग्रामस्थ गेली २५ वर्षे मिशन बंधारे मोहीम राबवत आहेत. मिशन बंधारे मोहिमेमुळे ग्रामस्थांनी पाणीटंचाईवर मात करण्यात यश मिळवले आहे. दरवर्षी ग्रामस्थ लोकसहभागातून गावात ३५ ते ४० बंधारे बांधतात. या बंधारे मोहिमेमुळे गावातील पाणीस्रोतांच्या पातळीत वाढ झाल्यामुळे मे अखेरपर्यंत शेतकºयांच्या बागायतींना मुबलक पाणी उपलब्ध होते.
आगारवायंगणी गावात पंयायत समितीतील महिला कर्मचारी व गावातील महिला बचत गटांच्या माध्यमातून बंधारा बांधण्यात आला आहे. महिलांनी श्रमदान करुन समाधानकारक काम केले आहे. कोकणात सर्वाधिक पाऊस पडत असला, तरीही पडणारे पाणी जमिनीत न मुरल्यामुळे पाणी टंचाईसारख्या परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. परंतु, आगारवायंगणी गावाने श्रमदानातून बांधलेले बंधारे कौतुकाला पात्र आहेत. या गावात मिशन बंधारेच्या माध्यमातून अडविण्यात आलेले पाणी लोकांना खूप फायद्याचे आहे. गावाने लोकसहभागातून उत्स्फूर्तपणे राबविलेली मिशन बंधारे मोहीम कौतुकाला पात्र आहे.
- आंचल गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी, रत्नागिरी.