लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : गेल्या दीड वर्षापासून कोरोनाने अवघ्या जगाचे अर्थकारण ठप्प केले आहे. याचा फटका अंध व्यक्तींनी चरितार्थासाठी सुरू केलेल्या व्यवसायाला मोठ्या प्रमाणावर बसला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने दुसऱ्यांदा सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे पुन्हा अंध व्यक्तींचे व्यवसाय ठप्प झाल्याने आता चरितार्थ कसा चालवायचा, हा यक्ष प्रश्न उभा राहिला आहे. त्यामुळे या व्यक्ती आपल्या व्यवसायासमोरील अंधार कधी दूर होणार, याची प्रतीक्षा करत आहेत.
परावलंबी जीवन न जगता स्वत:च्या पायावर उभे राहता यावे, यासाठी जिल्ह्यातील अनेक अंध व्यक्ती मेणबत्ती बनवणे, फिनेल बनवणे, फर्निचर तयार करणे आदी छोटे-छोटे व्यवसाय करून त्यावर आपली गुजराण करत आहेत. गेल्यावर्षी मार्च महिन्यापासून लॉकडाऊन सुरू झाले ते अगदी सहा महिन्यांपर्यंत सुरू होते. त्यामुळे या व्यक्तींचे व्यवसायही बंद राहिल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती.
त्यानंतर पुन्हा काही महिने व्यवसाय सुरू होता. यातून आर्थिकदृष्ट्या सावरण्याचा प्रयत्न करतानाच आता दुसऱ्यांदा लॉकडाऊन सुरू झाले आहे. त्यामुळे त्यांचे व्यवसायही पूर्णपणे थांबले आहेत.
चौकट
शासनाकडून अपेक्षा...
जिल्ह्यातील अनेक अंध व्यक्ती काही ना काही व्यवसाय करून आपल्या पायावर उभ्या आहेत. गेल्या लॉकडाऊनमध्ये जवळपास सहा महिने या व्यक्तींचे व्यवसाय बंद राहिले होते. त्यातून काही काळ सावरत असतानाच पुन्हा लॉकडाऊनचे संकट आले आहे. या व्यक्तींसाठी आतापर्यंत रत्नागिरीतील आस्था सोशल फाऊंडेशन, चिपळूणची नॅब आदी संस्था या व्यक्तींना न्याय मिळावा, त्या स्वावलंबी व्हाव्यात तसेच त्यांना त्यांचे हक्क मिळावेत, यासाठी झगडत आहेत. या लॉकडाऊनमध्ये अंध व्यक्तींचे व्यवसाय थांबल्याने त्यांना शासकीय मदतीचा हात मिळावा, अशी अपेक्षा या संस्था व्यक्त करतात.
चौकट
जिल्ह्यात एक कुटुंब पॉझिटिव्ह
कोरोना काळात अंध व्यक्तींनी कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन कोटेकोरपणे केल्याने जिल्हाभरात एक अंध कुटुंब पॉझिटिव्ह झाले होते. मात्र, गृह अलगीकरणामध्ये राहून त्यातून सर्व सदस्य सुखरूप बाहेर पडले.
कोट
माझा सुरूवातीला मेणबत्ती, अगरबत्तीचा व्यवसाय होता. आता फिनेल बनवणे, वाहने स्वच्छ करण्यासाठीचे द्रव बनवणे हा व्यवसाय करतो. मात्र, दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये माझा हा व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवावा लागला आहे.
- महेश देवलाटकर, धामापूर, ता. संगमेश्वर
माझी पत्नी मंद बुद्धी आहे, त्यामुळे ती काही करू शकत नाही. माझा पूर्वी गावात चप्पल शिवण्याचा धंदा होता. परंतु, तो लॉकडाऊनमध्ये बंद झाल्याने मी आता पत्नीसमवेत खारेपाटण येथे आलो आहे.
- दीपक समजीस्कर, भालावली, ता. राजापूर
माझे पतीही अंध आहेत. मात्र, ते दहा वर्षांपासून निसर्गोपचार करत आहेत. मीही लग्नानंतर गेल्या ३ वर्षांपासून त्यांना मदत करत आहे. आमची या व्यवसायावर गुजराण होते. मात्र, गेल्या दीड महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे आमचा हा व्यवसाय ठप्प झाला आहे.
- मयुरी जोशी, कोळंबे, रत्नागिरी
पहिल्या लॉकडाऊनमध्ये अनेक अंध व्यक्तींचे व्यवसाय ठप्प झाले. लॉकडाऊन संपल्यानंतर त्यातून हळूहळू सावरत असतानाच पुन्हा त्यांचे व्यवसाय थांबल्याने उपासमारीची वेळ आली आहे. गेल्या लॉकडाऊनमध्ये शासनाने या व्यक्तींना काहीअंशी चांगली मदत केली होती. त्यामुळे आता दुसऱ्या लॉकडाऊनवेळीही त्यांचे व्यवसाय बंद असल्याने त्यांना मदतीचा हात दिल्यास त्यांची उपासमार टळेल.
- संदीप नलावडे, जनसंपर्क अधिकारी, नॅब, चिपळूण