राजापूर : जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, आमदार राजन साळवी यांनी राजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये
अद्ययावत काेविड रुग्णालय उभारण्याचे निश्चित केले आहे. त्यासाठी आमदार स्थानिक विकास निधीमधून १ कोटी रुपयांचा निधी मंजुरी घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर केला आहे.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राजापूर तालुक्यातील कोविडचा प्रादुर्भाव व उपाययोजनेबाबत आढावा बैठक घेतली. यावेळी काेविड रुग्णालयाबाबत चर्चा करण्यात आली. या चर्चेमध्ये राजन साळवी यांनी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्हा शासकीय रुग्णालयावरील वाढता ताण, तसेच रुग्णांना रुग्णवाहिकेमधून रत्नागिरी येथे नेण्याची परवड थांबण्यासाठी राजापूर विधानसभा मतदारसंघाच्या मध्यवर्ती ठिकाणी अद्ययावत काेविड रुग्णालय उभारण्याचे निश्चित केले आहे. ओणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामधील परिचारिका प्रशिक्षण केंद्राची पूर्णत्वास आलेली इमारत वापरण्यास योग्य आहे. तेथे ३० बेडचे सुसज्ज अद्ययावत काेविड रुग्णालय उभारणे शक्य होईल, असे सांगितले आहे.
परिचारिका प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीची उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यासमवेत आमदार राजन साळवी यांनी पाहणी केली. तसेच उदय सामंत यांनी अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांना संबंधित विभागाला तत्काळ सूचना देण्याचे आदेश दिले.
...............................................
फोटो कप्शन -
ओणी येथील परिचारिका प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीची उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पाहणी केली. यावेळी आमदार राजन साळवी, अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, प्रभारी उपविभागीय अधिकारी बनसोडे, तहसीलदार प्रतिभा वराळे, नगराध्यक्ष जमीर खालिफे, गटविकास अधिकारी पाटील, वैद्यकीय अधिकारी, सार्वजनिक बांधकाम उपभियंता उपस्थित हाेते.