दापोली : आपल्या मित्रांसमवेत जंगलामध्ये शिकारीला गेलेल्या दापोली तालुक्यातील नानटे कांबळेवाडी येथील दत्ताराम खळे (६९) यांचा आपल्या सहकाऱ्यांच्या बंदुकीतील गोळी लागून दुर्दैवी अंत झाला असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. चार महिन्यांपूर्वी हा प्रकार घडला होता. मात्र जंगलात शिकारीसाठी गेले असताना त्यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत होते. आता पत्रकारांनीच हे प्रकरण उघड करुन सहकाऱ्याच्या बंदुकीतून सुटलेल्या गोळीने त्यांचा मृत्यू झाला असल्याचा मुद्दा पुढे आणला आहे.
पत्रकारांच्या सतर्कतेमुळे तब्बल चार महिन्यांनी हा प्रकार जगापुढे आला आहे. दापोली तालुक्यातील नानटे कांबळेवाडी येथील येथे दत्ताराम खळे यांचे घर आहे. पत्नीच्या निधनानंतर ते गावात एकटेच राहत होते. त्यांच्या दोन मुली विवाहित असून, मुलगा मुंबई येथे नोकरी करतो. ते आपल्या काही मित्रांसमवेत अधेमधे शिकारीला जात असत.
४ डिसेंबर २०२१ रोजीही ते मित्रांसोबत शिकारीसाठी गेले होते. त्या वेळी दुसऱ्या व्यक्तीच्या हातातील बंदुकीची गोळी त्यांच्या शरीरातून आरपार गेली. यामुळे जंगलातच जागच्या जागी मृत्यू ओढवला. या प्रकारामुळे घाबरलेल्या त्यांच्या मित्रांनी हा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे सांगितले. संपूर्ण शरीराला कापड गुंडाळून त्यांचा मृतदेह रात्री गावांमध्ये आणण्यात आला.
खळे यांची मुले सकाळी गावात येऊन हजर होतात घाईघाईत अंत्यसंस्कार उरकून घेण्यात आले. खळे यांच्या मुलांना त्यांच्या वडिलांना अंतिम अंघोळदेखील घालायला दिली नाही. यामुळे या मुलांना आपल्या वडिलांचा खून झाल्याचा संशय आला. मात्र ही मुले वडिलांच्या निधनाच्या धक्क्यातून सावरली नसल्याने त्यांनी याबाबत कुठेही वाच्यता केली नाही.
धमकीमुळे सारे गप्प
काही दिवसांनी गावांमध्ये या घटनेची चर्चा होऊ लागली. मात्र याबाबत धमकी देण्यात आल्याने हे प्रकरण पोलीस स्थानकापर्यंत गेले नसल्याची चर्चा आहे. हा प्रकार कळल्यानंतर दापोलीतील पत्रकारांनी घटनास्थळी जाऊन पुरावे गोळा केले. गावातील अनेक लोकांच्या मुलाखती घेतल्या. त्यातून ही बाब पुढे आली आहे. आता या प्रकरणात पोलीस काय भूमिका घेतात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.