दाऊदची गावाकडील मालमत्ता होणार जप्त; मूल्यांकन सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2019 05:25 PM2019-06-17T17:25:25+5:302019-06-17T19:38:28+5:30
मुंबईतील अमिना मेन्शन या शेवटच्या इमारतीचा गेल्यावर्षी लिलाव करण्यात आला होता.
रत्नागिरी : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील विविध मालमत्तांचा लिलाव यशस्वी झालेला असताना उच्च न्यायालयाने आता त्याच्या मूळगावी मोर्चा वळविला आहे. खेड तालुक्यातील मुंबकेयेथील त्याच्या वडीलोपार्जित मालमत्तेचे मूल्यांकन सुरू झाले आहे.
दाऊदने 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटानंतर परदेशात पलायन केले होते. सध्या तो पाकिस्तानात असल्याचा दावा भारतीय गुप्तहेर यंत्रणांनी केला आहे.
मुंबईतही त्याच्याविरोधात कारवाई सुरु असून दाऊदच्या विविध मालमत्ता जप्त करण्यात येत आहेत. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार दाऊदचे रत्नागिरीतील मूळ गाव मुंबकेयेथे पोलिसांसह महसूल विभागाचे पथक पोहोचले असून त्याच्या संपत्तीचे मोजमाप सुरु करण्यात आले आहे. लवकरच ही संपत्ती जप्त करण्यात येणार आहे. मुंबके येथे तीन मजली इमारत, पेट्रोल पंपासाठीची जागा तसेच बाग अशी मालमत्ता मुंबके येथे आहे. ही मालमत्ता दाऊदची बहीण हसिना पारकर तसेच दाऊदच्या आईच्या नावावर आहे.
मुंबईतील अमिना मेन्शन या शेवटच्या इमारतीचा गेल्यावर्षी लिलाव करण्यात आला होता. या लिलावात ३.५१ कोटीं रुपये प्राप्त झाले होते.
दाऊद इब्राहिम 1993मधल्या मुंबई बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी आहे. या दहशतवादी हल्ल्यात 257 मुंबईकरांना स्वतःच्या प्राणांना मुकावं लागलं होतं. तसेच अनेक जण जखमीही झाले होते. या हल्ल्यानंतर दाऊद इब्राहिम देश सोडून पळाला. 2012मध्ये सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणात सुनावणी करताना अमिना कासकर आणि हसिना पारकर यांना मालमत्तेचे दस्तावेज दाखवण्यास सांगितले होते.
परंतु दोघींनाही मालमत्तेचे दस्तावेज न्यायालयात सादर करता आलेले नव्हते. दाऊदच्या आई- बहिणीच्या नावावर मुंबईतल्या उच्चभ्रू वस्तीत 7 मालमत्ता आहेत. ज्यातील दोन अमिना यांच्या नावावर होत्या, तर 5 मालमत्ता हसिना पारकर यांच्या नावे होत्या.
दाऊदला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनंही जागतिक दहशतवादी घोषित केलं आहे. दक्षिण मुंबईतलं दाऊदचं एक हॉटेल आणि गेस्ट हाऊसचा सरकारनं पहिलाच लिलाव केला आहे. भारताच्या आग्रहाखातर इतर देशांनीही दाऊदची मालमत्ता जप्त करण्याच्या कारवाईला सुरुवात केली आहे.