चिपळूण : शहरातील मटण-कोंडी विक्रेते काहीवेळा नदीकिनारी कचरा टाकत असल्याने दुर्गंधी पसरते. तसेच नदीतील पाणीही मोठ्या प्रमाणावर दूषित होते. यावर पर्याय म्हणून सर्व कचऱ्यावर इकॉनॉमिक यंत्राद्वारे प्रक्रिया करण्याचा प्रकल्प प्रायोगिकतत्त्वावर राबवण्याचा चिपळूण नगर परिषद प्रशासनाचा प्रयत्न असल्याची माहिती उपनगराध्यक्ष लियाकत शाह यांनी आज (सोमवारी) पत्रकारांशी बोलताना दिली.येथील घनकचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी शिवाजीनगर येथे प्रकल्प असून, घंटागाडीद्वारे कचरा नियमित उचलला जात आहे. मात्र, बाजारपेठेत मटण-कोंबडी विक्रेते आहेत. मृत कोंबड्यांचे अवशेष व बकऱ्यांची हाडे यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प नसल्याने या व्यावसायिकांची गैरसोय होत आहे. काहीवेळा प्रशासनाची नजर चुकवून मटण-कोंबडी व मच्छी विक्रेते टाकाऊ अवशेष नदीकिनारी टाकत असल्याने दुर्गंधी पसरते. त्यामुळे त्यांना रोषाला सामोरे जावे लागते. संबंधित व्यावसायिकांनी त्यांच्या कचऱ्याची विल्हेवाट त्यांनीच लावावी, अशी सूचनाही करण्यात आली असून, त्यानुसार हे काम सुरु आहे.मात्र, मृत कोंबड्यांचे अवशेष, बकऱ्यांची हाडे व अन्य कचरा यावर प्रक्रिया करण्यासाठी पुणे येथील इकॉनॉमिक कंपनीने सहमती दर्शवली आहे. एक महिना प्रायोगिकतत्त्वावर हा नवा प्रकल्प सुरु करण्याचा प्रस्ताव कंपनीकडून ठेवण्यात आला आहे. घनकचरा एकत्रित करुन या यंत्राद्वारे त्यावर प्रक्रिया झाल्यानंतर त्यापासून खतही तयार होणार आहे. यासाठी यंत्राला वीजजोडणी द्यावी लागणार आहे. प्रस्तावावर विचारविनिमय करण्यास नगर परिषद प्रशसन तयार असून, व्यावसायिकांचा या प्रकल्पामुळे प्रश्न मार्गी लागेल. नगर परिषद प्रशासन पुढील होणाऱ्या सभेत यावर चर्चा करुन निर्णय घेईल, असे उपनगराध्यक्ष शाह व बांधकाम सभापती बरकत वांगडे यांनी पत्रकारांना सांगितले. (वार्ताहर)इकॉनॉमिक यंत्राद्वारे प्रायोगिक तत्त्वावर प्रकल्प राबवण्याबाबत चिपळूण नगर प्रशासन विचाराधीन.पुणे येथील इकॉनॉमिक कंपनीचा प्रस्ताव.बेकरी फूड, भाजीपाला, मेडिसीन, प्लास्टिक, झाडांच्या बारीक फांद्या यावरही होणार प्रक्रिया.
मृत कोंबड्या, बकऱ्याच्या हाडांवर प्रक्रिया
By admin | Published: December 01, 2014 9:29 PM