राजापूर : एका ३५ वर्षीय मूकबधिर महिलेवर तरुणाने अत्याचार केल्याची घटना राजापूर तालुक्यातील एका गावात गुरुवारी दुपारी घडली. याप्रकरणी पाेलिसांनी गणेश चंद्रकांत कदम (३४) याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.याबाबत पाेलिस निरीक्षक राजाराम चव्हाण यांनी माहिती दिली. ही पीडित महिला मूकबधिर असून, ती आपल्या आई-वडिलांसोबत राहते. शेतावर गेलेल्या वडिलांना डबा देण्यासाठी तिची आई दुपारी १२ वाजता घरातून निघून गेली. त्यावेळी पीडिता घरात एकटीच असल्याचा फायदा घेत गणेश कदम याने घरातून तिच्यावर अत्याचार केला.दरम्यान, शेजारी राहणाऱ्या एका वयोवृद्ध महिलेला घरातून पीडित महिलेच्या ओरडण्याचा आवाज आला. त्यानंतर वयाेवृद्ध महिला घराच्या मागील बाजूने गेली असता दरवाजा बंद होता. ती पुढील दरवाजाने आली असता दरवाजा ढकलून आत गेली असता घरातून गणेश कदम हा बाहेर पडला. यावेळी पीडित महिला रडत होती. त्यानंतर शेजारी राहणारी आणखी एक महिला या ठिकाणी आली. त्यांनी पीडितेच्या आईला बाेलावून घटनेची माहिती दिली. तसेच पीडितेने खाणाखुणा करून घडलेला सर्व प्रकार सांगितला.याबाबत राजापूर पोलिस स्थानकात फिर्याद देताच गणेश चंद्रकांत कदम याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम ६४ (२) चे (आय, के) व कलम ३३२ (बी) अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक राजाराम चव्हाण यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. उपविभागीय पाेलिस अधिकारी यशवंत केडगे यांनीही घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. या प्रकरणी अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक मोमीन शेख करत आहेत.
काहीच झाले नाही असा आविर्भावया घटनेनंतर गणेश कदम हा काही झालेच नाही अशा आविर्भावात ज्या ठिकाणी काम करत होता, तिथे काम करत होता. पीडितेने त्याच्याकडे बोट करून याने आपल्यावर अत्याचार केल्याचे आईला सांगितले. त्यानंतर आईने पाेलिस स्थानक गाठले.