लाेकमत न्यूज नेटवर्क
साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील साखरपाजवळच असणाऱ्या किरबेट गावात जवळच असणाऱ्या उडगिरीच्या जंगलाजवळ शांताराम जयगडे यांच्या जमिनीत मंगळवारी दोन गवा रेडे मृतावस्थेत आढळले. या दाेघांची एकमेकांशी झुंज हाेऊन शिंगे अडकल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या गवारेड्यांचे वय साधारण सात ते आठ वर्षे इतके आहे.
किरबेट गावाजवळ असणाऱ्या उडगिरीच्या जंगलात मंगळवारी सकाळी १० वाजण्याच्या दरम्यान मनाेज सदानंद जायगडे हे जनावरे चरण्यासाठी घेऊन गेले हाेते. त्यांना जंगलात हे दाेन गवारेडे मृतावस्थेत पडलेले दिसले. त्यांनी याबाबत पाेलीस पाटील प्रदीप अडबल यांना माहिती दिली. ते सरपंच रेवती निंबाळकर आणि ग्रामस्थांसह जंगलात दाखल झाले.
पाेलीस पाटील प्रदीप अडबल यांनी याबाबत वनविभागाला माहिती दिली. त्यानंतर परिक्षेत्र वनविभागाचे प्रियंका लगड, वनपाल तैफिक मुल्ला, वनरक्षक नानू गावडे, मिलिंद डाफळे, सुरेश तेली, राजाराम पाटील, पशुवैद्यकीय अधिकारी अरुण कुणकवळेकर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. या वेळी सरपंच रेवती निंबाळकर, पाेलीस पाटील प्रदीप अडबल यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित हाेते.
गवारेड्यांमध्ये झालेल्या झुंजीमुळे दाेघांची शिंगे एकमेकांमध्ये अडकली हाेती. शेवटपर्यंत ती सुटू न शकल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. अथक प्रयत्नानंतर गवारेड्यांना बाजूला करण्यात आले.
किरबेट परिसरात गवारेड्याचा वावर असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले हाेते. अनेकांनी या भागात अनेकवेळा गवारेडाही पाहिला हाेता. याबाबत ग्रामस्थांनी वनविभागाकडे तक्रारी केल्या होत्या. दरम्यान, गवारेड्यांचा मृत्यू झाल्याची दुर्मीळ घटना घडली. त्यामुळे मृत गवारेडे पाहण्यासाठी गर्दी झाली होती.