रत्नागिरी : रत्नागिरीतील एका बँकेने कर्ज प्रकरण नामंजूर केल्याने नजीकच्या नाचणे येथील एका प्रौढाने स्वत:ला पेटवून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांना वाचविण्यासाठी धावलेला मुलगा गंभीर भाजला होता. या मुलाचा मिरज येथे मृत्यू झाला, तर वडिलांची स्थिती गंभीर आहे. ही घटना दि. २६ जुलैला घडली होती. रामचंद्र देवू येडगे (वय ४१) यांनी काही महिन्यांपूर्वी एक हॉटेल करार पद्धतीने चालविण्यास घेतले होते. त्यासाठी त्यांनी काही लोकांकडून उसने पैसे घेतले होते. अनेकांचे देणे खांद्यावर असल्याने त्यांनी कर्ज प्रकरण करून हे देणे फेडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार त्यांनी बँकेत कर्ज प्रकरण केले होते. मात्र, बँकेने कर्ज देण्यास नकार दिल्याने त्यांना धक्का बसला. त्यांनी दि. २६ रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. वडिलांनी जाळून घेतल्याचे कळल्यानंतर त्यांचा मुलगा रवी (२१) हा धावत आला आणि त्याने त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये तोही गंभीररीत्या भाजला. आरडाओरडा ऐकून शेजाऱ्यांनी धाव घेतली. भाडेकरुंनी या दोघांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने दोघांनाही मिरज येथे हलविण्यात आले. वडील रामचंद्र हे ७६ टक्के, तर मुलगा रवी हा ८० टक्के भाजला होता. रवी याचा शनिवारी रात्री उपचार सुरू असताना मृत्यू झाला, तर वडील अजूनही गंभीरच आहेत. मृत रवी याच्या मृतदेहावर चर्मालय येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. (प्रतिनिधी)
वडिलांना वाचविणाऱ्या मुलाचा मृत्यू
By admin | Published: August 01, 2016 12:31 AM