रत्नागिरी - मुंबई -गोवा महामार्गावरील कापडगाव येथे जीर्ण झालेल्या बाथरूमची भिंत कोसळून चार वर्षीय बलिकेचा मृत्यू झाला. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पेरूचे झाड भिंतीवर आदळत असल्याने भिंत कोसळली. तेथे खेळत असलेली स्वरा विनायक कुरतडकर ही भिंतीखाली सापडली. या मध्ये तिचा मृत्यू झाला.या घटनेमुळे कापडगाव गावावर शोककळा पसरली आहे.कापडगाव येथील महेश कुरतडकर यांच्या घराच्या मागील बाजूला जुने बाथरूम आहे. शुक्रवारी सायंकाळी सर्व लहान मुले याच परिसरात खेळत होती. जीर्ण बाथरूमच्या भिंतीजवळ पेरुचे झाड असून वाऱ्यामुळे ते भिंतीवर घासत होते. मात्र त्याकडे बाथरूम मालकाने दुर्लक्ष केले. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास भिंतीच्या बाजूला लहान मुले खेळत असताना अचानक भिंत कोसळली. यावेळी भिंतीचा काही भाग स्वरा कुरतडकर हिच्या अंगावर पडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुरेश कदम आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहचले. कर्मचारी श्री झगडे,कॉ. मोहन पाटील यांनी स्वाराला पाली ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.मात्र स्वराचा मृत्यू झाल्याचे समजताच नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला.
रत्नागिरीत भिंत कोसळून ४ वर्षीय बलिकेचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2019 12:00 AM