चिपळूण : तालुक्यातील पोसरे बौद्धवाडी येथे दबा धरून बसलेल्या बिबट्याने एका तरुणावर झडप घातली. यावेळी बिबट्या जाड तारांच्या कंपाऊंडमध्ये अडकल्यामुळे तरुणाच्या जीवावरचे संकट हातावर निभावले. त्याच्या दोन्ही हाताला बिबट्याच्या केवळ नख्या लागल्या. विशेष म्हणजे हल्ल्यानंतर बिबट्याचाही मृत्यू झाला. ही घटना आज, रविवारी सकाळी ६.४५ वाजता घडली. अविनाश शांताराम शिर्के (वय ३५) हा तरुण दूध घालण्यासाठी जात असताना पोसरे बौद्धवाडीजवळ आला असता अचानक बिबट्याने त्याच्यावर झडप घातली. यावेळी बिबट्याच्या नख्या त्याच्या दोन्ही हातांना लागल्या. तोल सावरताना दुसऱ्या बाजूच्या तारेच्या कुंपणावर पाठीवर पडल्यामुळे तो जखमी झाला. जाड तारेत अडकल्यामुळे बिबट्याही गंभीर जखमी झाला. तारेतून कसाबसा बाहेर पडून काही अंतरावर तो झुडपात जाऊन पडला. त्यामुळे हल्ला करून बिबट्या पळाला, असाच सर्वांचा समज होता. या घटनेचे वृत्त सरपंचांनी वनखात्याला कळविले. त्यानुसार वनरक्षक जितेंद्र बारशिंगे व महादेव पाटील यांनी तरुणाला प्रथम कामथे उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु, तेथे वैद्यकीय अधिकारी नसल्याने अधिक उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर परिसराची पाहणी करत असताना अर्धा किलोमीटर अंतरावर काहीजणांना एका झुडपात बिबट्या झोपलेला आढळला.
तरुणावर हल्ला करणाऱ्या बिबट्याचा मृत्यू
By admin | Published: July 14, 2014 12:08 AM