गुहागर : तालुक्यातील धोपावे तरीबंदर येथे फेरीबोटजवळ १४ ऑगस्ट राेजी आढळलेल्या नवजात बालिकेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अद्याप या नवजात अर्भकाचे माता व पालक कोण? याचा शोध घेण्यात पोलिसांना यश आलेले नाही.
धोपावे तरीबंदर फेरीबोटजवळ खाजणात १४ ऑगस्ट राेजी रात्री नवजात अर्भक सापडले होते. धोपावेतून दाभोळकडे जाणारा एक प्रवासी रात्री ९च्या सुमारास लघुशंकेसाठी धोपावे फेरीबोट तिकीट घरामागील शौचालयात गेला. त्यावेळी त्याला लहान मुलाच्या रडण्याचा आवाज आला व आजूबाजूला रक्त सांडलेले दिसले. या प्रवाशाने तिकीट गृहातील कर्मचाऱ्यांना याची माहिती दिली. यावेळी खाडीच्या किनाऱ्यालगत खाजणात नवजात अर्भक दिसले. तरीबंदरमधील एका तरुणाने त्या अर्भकाला बाहेर काढले व याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली.
पोलिसांनी त्याला उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल केले. याठिकाणी उपचारादरम्यान हे नवजात अर्भक ९ महिने ९ दिवस पूर्ण होण्याआधीच जन्माला आल्याचे लक्षात आले. जिल्हा रुग्णालयात त्याचे सिटी स्कॅन करण्यात आले. त्यावेळी बाळाच्या मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाल्याचे तसेच फुफ्फुस, मेंदू, मणका आदी अवयवांचा विकास झाला नसल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. त्यानंतर १६ ऑगस्ट राेजी सायंकाळी जिल्हा रुग्णालयातून अन्य रुग्णालयात बालिकेला हलविण्यात आले. मात्र, १८ राेजी पहाटे या बाळाचा मृत्यू झाला.