खेड : पंक्चर काढण्यासाठी रस्त्याच्या बाजूला थांबलेल्या खासगी बसच्या खिडकीला टेम्पाे घासून गेल्याने खिडकीत डाेके टेकून झाेपलेल्या सात वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. आदिती ब्रिजेश डिंगणकर (रा. जामसूद, गुहागर) असे या चिमुकलीचे नाव असून, मुंबई - गाेवा महामार्गावरील खेड तालुक्यातील नातूनगर बसथांबा येथे बुधवारी सकाळी ही घटना घडली. या घटनेमुळे सुटीसाठी गावी आलेल्या डिंगणकर कुटुुंबावर दु:खाचा डाेंगर काेसळला आहे.गोरेगाव (मुंबई) येथून आदिती ही आपल्या आई-वडील व कुटुंबीयांसोबत शाळेला सुटी पडल्याने गुहागर तालुक्यातील जामसूद येथे खासगी आराम बस (एमएच ४८ बीएम १३४०) येत हाेती. खेड तालुक्यातील कशेडी घाट उतरल्यानंतर बस पंक्चर झाल्याचे चालकाला जाणवले. महामार्गावरील नातूनगर बस थांब्याजवळ पंक्चरसाठी रस्त्याच्या बाजूला गाडी उभी केली हाेती.या गाडीत खिडकीला डाेके टेकून आदिती झाेपलेली हाेती. पंक्चर काढण्याचे काम सुरू असताना बुधवारी सकाळी ७ ते ७:३० वाजेदरम्यान पाठीमागून भरधाव वेगाने येणारा टेम्पो आदिती झाेपलेल्या बसच्या खिडकीला बाहेरून जोरदार घासून गेला. यामध्ये आदितीच्या डोक्याच्या चिंधड्या झाल्या.या अपघातानंतर सर्वच प्रवासी घाबरून गेले. आदितीच्या आई-वडिलांना जाेरदार धक्का बसला. अपघाताची माहिती मिळताच त्याठिकाणी पोलिसांनी धाव घेतली. आदितीचा मृतदेह कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला हाेता. आदितीबरोबरच तिच्या समोरच्या खिडकीत बसलेल्या एका प्रवाशाच्या हाताला दुखापत झाली आहे. या घटनेतील टेम्पाेचा पाेलिसांकडून शाेध सुरू आहे.
दुसरीत जाण्याआधीच काळाने हिरावलेआदिती ही गोरेगाव येथील आदर्श विद्यालय इंग्लिश मीडियम स्कूल येथे शिकत होती. तिचा पहिलीचा निकाल लागला हाेता. ती पास हाेऊन दुसरीच्या वर्गात जाणार हाेती. दुसरीच्या इयत्तेसाठी पुस्तके, वह्याही तिने खरेदी केल्या हाेत्या. मात्र, दुसरीला जाण्याआधीच काळाने तिला हिरावून घेतले.
सुटी, लग्नासाठी गावीशाळेला सुटी असल्याने आणि गावी नातेवाइकांचे लग्न असल्याने ती कुटुंबासमवेत जामसूद येथे येत हाेती. मात्र, सुटीचा आनंद लुटण्याआधीच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. तिच्या जाण्याने लग्न समारंभावरही दु:खाची छाया पसरली हाेती.