रत्नागिरी : लाॅकडाऊनमुळे छोटे व्यावसायिक व शेतकरी अडचणीत सापडले आहेत. बॅंक कर्जाचे हप्ते कसे भरायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने छोटे व्यावसायिक व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, अशी मागणी शेतकरी व्यावसायिक करीत आहेत. लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांचे उत्पादित माल वाया जात आहे.
मोबाईल टेस्टिंग व्हॅन
खेड : खेड नगर परिषद व तालुका आरोग्य विभाग यांच्यातर्फे मोबाईल टेस्टिंग व्हॅनची सुविधा उपलब्ध केली आहे. फळविक्रेते, भाजी, दूध विक्रेते, होम डिलिव्हरी व्यावसायिक, मेडिकल स्टोअर्स यांनी आरटीपीसीआर, ॲन्टिजेन चाचणी करून घेण्याचे आवाहन मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी केले आहे.
किनारे रिकामे
रत्नागिरी : कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने शासनाकडून सर्वत्र कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे तालुक्यातील पर्यटकांची संख्या ठप्प झाली असून, नेहमी गजबजलेले समुद्र किनारे शांत झाले आहेत. रस्ते निर्मनुष्य झाले असून, सर्वच व्यवसायांवर परिणाम झाला आहे.
उकाड्याने नागरिक हैराण
रत्नागिरी : गेले काही दिवस उकाडा प्रचंड वाढला आहे. तीव्र उन्हामुळे अंगातून घामाच्या धारा वाहत आहेत. लाॅकडाऊनमुळे लोक घराबाहेर पडणे टाळत आहेत. त्यामुळे एस. सी., कुलर, पंख्यांचा वापर वाढला आहे. काेरोनाच्या भीतीमुळे मात्र शीतपेयांचे सेवन टाळत आहेत.
विद्यार्थ्यांमध्ये समाधान
गणपतीपुळे : दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्याने विद्यार्थी, पालकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. जूनमध्ये परीक्षा घेणार असल्याने मुले अभ्यासात व्यस्त होती, मात्र परीक्षाच रद्द केल्याने मुलांनी अभ्यास बंद केला असून, वह्या, पुस्तके गुंडाळून ठेवली आहेत.