चिपळूण : गेल्या अनेक महिन्यांपासून रखडेलल्या चिपळुणातील बहुचर्चित उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात झाली आहे. दोन रिग मशीनद्वारे पिलर उभारण्यासाठी उत्खनन केले जात असून, पुन्हा एकदा या कामाला वेग आला आहे. सध्या उभारण्यात आलेल्या पिलरच्या मधे आणखी एक पिलर उभा करण्याचे नवे डिझाईन मंजूर झाले असून, या कामासाठी डिसेंबर २०२५ पर्यंतची कालमर्यादा देण्यात आली आहे. त्यामुळे महामार्ग पूर्ण होण्यासाठी आता आणखी दीड वर्षे प्रतीक्षा करावी लागणार आहे.मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला आतापर्यंत तीनवेळा मुदतवाढ देण्यात आली परंतु तोही कालावधी आता कमी पडू लागला आहे. चिपळूणच्या सर्वाधिक १८०० मीटर लांबीच्या उड्डाणपुलाचे काम बराच काळ रखडले आहे. या पुलाच्या कामाला डिसेंबर २०२३ पर्यंत अंतिम मुदत होती. परंतु ऑक्टोबर २०२३ मध्ये काम सुरू असतानाच पुलाचा काही भाग कोसळला. शहरातील बहादूर शेखनाका येथे ही घटना घडली होती. त्यानंतर पुलाचे काम थांबविण्यात आले होते.उड्डाणपुलाच्या पहिल्या डिझाईननुसार ४० मीटरवर पिलर उभारण्यात आले होते. पिलरचे काम अंतिम टप्प्यात होते तसेच त्यासाठी लागणारे गर्डर ही पूर्णतः तयार झाले होते. अशातच दुर्घटना घडली आणि या उड्डाणपुलाचे काम थांबले. मात्र, बहादूरशेखनाका येथे वळणावरून हा पूल जात असल्याने डिझाईनमध्ये बदल करण्यात आला. नव्या डिझाईनला तब्बल सहा सात महिन्यांनंतर मंजुरी मिळाली. नव्या डिझाईननुसार दोन पिलरमधील गाळ्याचे अंतर २० मीटर राहणार आहे. प्रत्येक २० मीटरवर एक पिलर उभारण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या उड्डाणपुलासाठी नव्याने पिलर उभारणी करण्याचे काम सुरू झाले आहे. त्यासाठी अतिथी हॉटेलच्या समोर खोदाईला सुरुवातही झाली. दोन रिग मशीन आणून उत्खनन सुरू आहे. पावसाळ्यापूर्वी शक्य तेवढ्या खोदाईवर भर दिला जाणार आहे. उड्डाणपुलासाठी आवश्यक असलेले गर्डर पुन्हा नव्याने केले जाणार असून त्यासाठी कळंबस्ते येथे प्लँट उभारण्यात आला आहे. पिलरवर गर्डर टाकल्यानंतर त्यावर काँक्रिटचा स्लॅब टाकून उड्डाणपुलाची उभारणी केली जाणार आहे. पहिल्या डिझाईननुसार दोन पिलरमधील अंतर ४० मीटर होते. मात्र, आता २० मीटरवर पिलर उभारले जात असल्याने गर्डरचेही त्याच पद्धतीने काम केले जाणार आहे.
उड्डाणपुलाचे काम ईगल कंपनीच करत आहे. केवळ ठेकेदार बदलला आहे. नव्या डिझाईनप्रमाणे काम सुरू झाले असून कोणत्याही परिस्थितीत डिसेंबर २०२५ पर्यंत हे काम मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील. उड्डाणपुल कोसळल्यानंतर तयार केलेले पहिले गर्डर आणि पॅन नष्ट करावे लागल्याने ठेकेदाराचेही मोठे नुकसान झाले. आता शासनाकडून उड्डाणपुलासाठी नव्याने वाढीव खर्च केला जाणार आहे. - आर. पी. कुलकर्णी, जिल्हा अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग