रत्नागिरी : भारतीय महापुरुषांची चरित्रे लिहिणारे रत्नागिरीचे सुपुत्र पद्मभूषण डॉ. धनंजय कीर यांचे नाव मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्राला देण्याच्या निर्णयाचे धनंजय कीर यांचे पुत्र डॉ. सुनीत कीर, नातू डॉ. शिवदीप कीर यांच्यासह सर्व स्तरांतून स्वागत करण्यात येत आहे. यासंबंधी आवश्यक ती पावले तातडीने उचलल्याबद्दल त्यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना धन्यवाद दिले आहेत.
डिसेंबर २०२०मध्ये मुंबई दूरदर्शनचे माजी सहाय्यक संचालक जयु भाटकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून धनंजय कीर यांचे नाव विद्यापीठ उपकेंद्राला देण्याची मागणी केली होती. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाने हा विषय उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे पाठवून भाटकर यांना तसे कळविले. भाटकर यांची मागणी वृत्तपत्रांमधूनही प्रसिद्ध झाली होती. ६ जानेवारी रोजी भाटकर यांनी मंत्री सामंत यांची भेट घेऊन त्यांना याबद्दल आवश्यक ती कार्यवाही करण्याची विनंती केली. दरम्यान, अशा नामकरणाची मागणी करत असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनीही पत्रकारांना दिली.
मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राला कीर यांचे नाव देण्याची मागणी अल्पावधीत मंजूर केल्याबद्दल भाटकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत व मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांना धन्यवाद दिले आहेत.
अनेकांनी मागणी करूनही ज्या विद्यापीठाने धनंजय कीरांना सन्मान्य डी.लिट. देण्याचा निर्णय घेतला नाही, त्याच मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राला त्यांचे नांव देण्याचा ठराव त्याच विद्यापीठाने संमत केला हे उशिरा का होईना, चरित्रकार धनंजय कीर यांच्या योग्यतेवर मुंबई विद्यापीठाने केलेले शिक्कामोर्तब आहे, अशा शब्दांत कीर यांचे चरित्र लिहिणारे मसुरकर यांनी समाधान व्यक्त केले.
चाैकट
धनंजय कीर यांच्या रत्नागिरी शहरातील घराजवळच राहणारे जयू भाटकर यांना लहानपणापासून या लेखकाबद्दल कुतूहल होते. रत्नागिरीच्या 'आकाशवाणी' केंद्रात निवेदक म्हणून रूजू झाल्यानंतर त्यांनी आपले सहकारी महेश केळुसकर यांच्या सहकार्याने धनंजय कीरांची मुलाखतही घेतली होती.