रत्नागिरी : जोपर्यंत वाहनचालकांची पूर्ण रक्कम ठेकेदाराकडून दिली जात नाही, तोपर्यंत ठरलेली रक्कम त्या ठेकेदाराला देण्यात येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेत घेण्यात आला.
ही सभा अध्यक्ष विक्रांत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी सर्व अधिकारी, सभापती उपस्थित होते. केारोनाच्या गंभीर परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या नियोजनाचे केंद्र सरकारसह सुप्रिम कोर्टानेही कौतुक केले. त्याबद्दल मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाचा ठराव या सभेत मंजूर करण्यात आला.
कंत्राटी वाहनचालकांच्या मानधनाबाबत या सभेत चर्चा झाली. जिल्ह्यातील ६७ प्राथमिक आरोग्य केंद्रांत रुग्णवाहिकांवर कार्यरत असलेल्या चालकांच्या मानधनात मागील महिन्यापासून वाढ करण्यात आली आहे. त्यांना १३,५०० रुपये मानधन देण्याचा निर्णय घेण्यात येऊन त्याप्रमाणे मानधन देण्यात येत आहे. एप्रिल महिन्याच्या वाढीव मानधनानुसार ठेकेदाराकडून अजूनही ७४२ रुपये चालकांना मिळालेले नाहीत. ही रक्कम पूर्ण करावी. त्यानंतर ठेकेदाराला त्याची ठरलेली रक्कम देण्यात येईल, असा निर्णय या सभेत घेण्यात आला.