गुहागर : आजपर्यंत असंघटित असलेले मच्छिमार बांधव आणि त्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून सुविधा मिळाव्यात, यासाठी शासनाने फिशरमॅन वेल्फेअर बोर्ड स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात बोटीवर काम करणारे खलासी, बोटींचे मालक आणि वितरकांचे प्रतिनिधी यांची मंत्रालयात एक विशेष बैठक झाली, त्यावेळी कामगारमंत्री भास्कर जाधव यांनी हा निर्णय जाहीर केला.वर्षातून पावसाळ्याचे ४ महिने ेवगळता समुद्रात बोटीवर जीवन जगणाऱ्या या समाजाचा आर्थिक स्तर वाढवा, त्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून आर्थिक सहाय मिळावे, हा विचार करुन शासनाने असंघटित मच्छिमार बांधवांसह बोटींचे मालक आणि वितरक यांना एकत्र करुन संबंधित खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत मंत्रालयात बैठक आयोजित केली होती.खलाशांमुळे मालकाचे आणि मालकामुळे खलाशाचे नुकसान होऊ नये, या मुद्द्यासह बोटींच्या मालकांनाही सोयीसुविधा उपलब्ध करुन देऊन घाऊक व्यापाऱ्यांकडून त्यांच्या मालाला चांगला भाव कसा मिळेल, याबाबतही बैठकीत चर्चा झाली. नेपाळ, गुजरात, कर्नाटकमधून रोजगारासाठी येणाऱ्या खलाशांना त्यांच्या कुटुंबाला सोयीसुविधा देता येऊ शकतील. केवळ समुद्रात किंवा खाडीत मच्छिमारी करणाऱ्यांनाच नव्हे; तर गोड्या पाण्यात मच्छिमारी करणाऱ्यांनाही या वेल्फेअर बोर्डाचे फायदे मिळू शकतील, असे जाधव यांनी सांगितले. बैठकीत चर्चेवेळी उपस्थित झालेल्या सर्व मुद्द्यांना बोटींच्या मालकांनीही मान्यता दर्शवली.या बैठकीला आमदार माणिक जगताप, चंदू पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष कुमार शेट्ये, दापोली - मंडणगड विधानसभा क्षेत्राध्यक्ष किशोर देसाई, मच्छिमार समाजाचे नेते दत्ताजी वणकर, भास्कर मोरे, चिपळूणचे माजी नगरसेवक फैसल कास्कर यांच्यासह खलासी, मालक व वितरक यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
मच्छिमारांसाठी वेल्फअर बोर्ड स्थापन करण्याचा निर्णय
By admin | Published: July 16, 2014 10:36 PM