लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : गणपती बाप्पा मखरात विराजमान होत असले तरी भोवताली करण्यात येणाऱ्या आकर्षक सजावटीमुळे मखराची शाेभा आणखी वाढत आहे. मखराला करण्यात येणारी विद्युत रोषणाई महत्त्वपूर्ण असली तरी पानाफुलांची सजावट त्यामध्ये भर घालते. गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या सजावटींच्या वस्तू मोठ्या प्रमाणावर बाजारात विक्रीसाठी आल्या आहेत. सजावटीचे प्रत्येक तयार साहित्य बाजारात उपलब्ध आहे.
प्लॅस्टिकबंदी असल्याने कागदी, क्रेपपासून बनविलेल्या फुलांच्या माळा, फुलांची कमान, पानांच्या वेली विक्रीसाठी उपलब्ध आहेत. लाल, पिवळ्या, हिरव्या, गुलाबी आदी विविध रंगातील फुलांच्या माळा तसेच हिरव्यागार वेलींसारख्या माळांची विक्री सुरू आहे. ३० रुपयांपासून २५० रुपयांपर्यंत या माळांचे दर सांगण्यात येत आहेत. खरोखरच्या टपोऱ्या फुलांप्रमाणे कागदी, क्रेपच्या फुलांचे गुच्छ, ताटवे यांनाही सजावटीसाठी विशेष मागणी आहे.
प्रत्येक भाविक आपल्या कल्पकतेने मखराची सजावट करीत असतात. त्यामुळे गणेशमूर्तीच्या मागे सोडलेल्या पडद्यावर मोती, कुंदन, काचेच्या माळा सोडण्यात येतात. त्यामुळे मखराची शोभा वाढते. या माळा २५ रुपयांपासून २५० रुपयांपर्यंत विक्रीला उपलब्ध आहेत.
पानाफुलांच्या माळांबरोबर विजेच्या माळांनाही सध्या अधिक मागणी आहे. स्वदेशी तसेच चायनामेड माळा विक्रीसाठी उपलब्ध आहेत. लवंगी, स्ट्रॉबेरी, ॲपल आदी आकारातील संगीत विद्युतमाळांना मागणी होत आहे. ६० रुपयांपासून ३०००रुपये किमतीला या माळा विकण्यात येत आहेत. फिरती छत्री, फिरते चक्र विक्रीसाठी उपलब्ध आहेत. एलईडी व एलजीपीचे रंगीत दिवे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. चायनामेड माळांपेक्षा स्वदेशी माळांचे दर अधिक असले तरी चायनामेड खरेदीसाठी ग्राहकांचा प्रतिसाद अत्यल्प आहे.
मूर्तीच्या गळ्यात बहुधा ताज्या फुलांचे हार घातले जातात. ताजे हार सर्वच भाविकांना अशक्य असल्याने दररोजच्या पूजेसाठी फुलांचा वापर केला जातो. मात्र, कृत्रिम हार गळ्यात आवर्जून घालण्यात येतो. पारंपरिक मण्यांच्या हारासह कागदी, क्रेपच्या फुलांचे हार विक्रीसाठी उपलब्ध आहेत. शिवाय पर्यावरणपूरक सुगंधी हार बाजारात विक्रीसाठी आले आहेत. त्याशिवाय गणपतीसाठी किरीट, बाजूबंद, जास्वंदीची फुलेही विक्रीसाठी उपलब्ध आहेत. चोखंदळ ग्राहक बाजाराचा फेरफटका मारून एकेक वस्तू खरेदी करत आहेत.