मेहरून नाकाडे ल्ल रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकरी बागायती जगवण्यासाठी ठिबक तथा सूक्ष्म सिंचन योजनेचा अवलंब करीत आहेत. सुरुवातीला भरघोस अनुदान देण्यात येत होते. मात्र, या अनुदानात घट झाली असून, ते ३५ टक्क्यांवर आणले आहे. सूक्ष्म सिंचन योजना राबवण्यासाठी जेवढा खर्च केला जातो, त्या तुलनेत अनुदान मिळत नसल्यामुळे शेतकरीवर्गातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. जिल्ह्याला अर्थार्जन् मिळवून देणारी आंबा व काजू महत्त्वाची दोन पिके आहेत. जिल्ह्यात ६५ हजार १०९ हेक्टर क्षेत्रावर आंबा पिकाची लागवड करण्यात आली असून, ५८ हजार ८३७ हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम आहे. काजूची लागवड ९१ हजार ५३० हेक्टर क्षेत्रावर करण्यात आली असून, ८३ हजार २९२ हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम आहे. रत्नागिरी जिल्हा डोंगरदऱ्यातून विभागलेला आहे. कातळावर, डोंगरावर कलम बागायती लागवड करण्यात आली आहे. कातळावरील विहिरींना पाणी मिळत नाही. एप्रिल, मेमध्ये पाण्याचा साठा कमी होत असल्याने कलम बागा जगवण्यासाठी पाण्याची आवश्यकता भासते. त्यासाठी सूक्ष्म सिंचन योजना फायदेशीर ठरत आहे. गेल्या दोन वर्षांपासून सूक्ष्म सिंचन योजना आॅनलाईन करण्यात आली आहे. गतवर्षी शासनाने सूक्ष्म सिंचन योजनेसाठी आॅनलाईन प्रस्तावाची मागणी केली होती. शेतकऱ्यांना आॅनलाईन सुविधेबाबत माहिती मिळेपर्यंत उशीर झाला. शिवाय १५ नोव्हेंबर रोजी शासनाची आॅनलाईन अर्ज करण्याची साईट सुरू करण्यात आली. त्यामुळे गतवर्षी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता आला नाही. सन २०१३ - १४मध्ये ९१ शेतकऱ्यांनी ठिबक योजनेचा लाभ घेतला होता. त्या शेतकऱ्यांना १३ लाख ३७ हजारांचे अनुदान वितरीत करण्यात आले होते. २०१४ - १५मध्ये ६६ शेतकऱ्यांनी लाभ घेतल्याने त्यांना ८ लाख ९१ हजारांचे अनुदान वितरीत करण्यात आले होते. गतवर्षी २०१५-१६मध्ये साईट सुरू न झाल्यामुळे शेतकऱ्यांकडून एकही प्रस्ताव पाठवण्यात आलेला नाही. प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेंतर्गत केंद्र पुरस्कृत सूक्ष्म सिंचन योजना २०१६ - १७साठी शासनाने आणली असून, ई - ठिबक आज्ञावलीमध्ये आॅनलाईन प्रणालीव्दारे अर्ज स्वीकारणे सुरू झाले आहे. दि. ६ आॅक्टोबरपर्यंत अर्ज पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आॅनलाईन प्रणालीमुळे शासनाने खर्चाचे मापदंड निश्चित केले आहे. बागायतीमध्ये शेतकऱ्याची विहीर असणे आवश्यक आहे. विहिरीपासून कलम बागायतीमध्ये कमालीचे अंतर असते. त्यामुळे बागायतीपर्यंत बसवण्यात आलेल्या पाण्याच्या वाहिनीचा खर्च सूक्ष्म सिंचनाच्या अनुदानासाठी ग्राह्य धरला जात नाही. साधारण एक हेक्टर क्षेत्रासाठी ठिबक योजना बसवण्यासाठी लाखभर रूपये खर्च येतो. सुरुवातीला सर्वसाधारण गटासाठी भरघोस अनुदान शासनाकडून देण्यात येत होते. मात्र, त्या अनुदानात आता घट केली आहे. सर्वसाधारण गटासाठी ३५ टक्के, तर अल्प-अत्यल्प गटासाठी ४५ टक्के अनुदान देण्यात येणार आहे. अनुदानाच्या रकमेत खर्च निघत नसल्यामुळे नाराजीचा सूर आहे. बहुतांश शेतकरी साधारणत: बागायती लागवडीनंतर ३ ते ५ वर्षे पाणी देतात. त्यानंतर मात्र पावसाच्या पाण्यावरच कलमांची वाढ होते. अधिकत्तम शेतकरी कलम बागा कराराने देत असल्यामुळे बागायतीमध्ये ठिबक बसविण्यास इच्छुक नसतात. मात्र, जे शेतकरी कराराने बागा न देताच स्वत: उत्पन्न घेतात, ते मात्र ठिबक बसवतात. कलम बागायतींसाठी ठिबक तर अन्य शेतींसाठी तुषार सिंचन बसविले जाते. कडक ऊन्हातून आंबा, काजू कलमांना अधूनमधून पाणी दिल्यास चांगली फळे मिळतात. अर्ज सादर करताना शेतकऱ्यांना जमिनीचा सातबारा, आठ अ, बँक पासबुकाच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत आवश्यक आहे. आॅनलाईन अर्ज केल्यानंतर संबंधित कागदपत्रे तालुका कृषी कार्यालयाकडे पाठविणे आवश्यक आहे. उन्हाळी शेतीवर भर : तुषार सिंचन फायदेशीर जिल्ह्याला अर्थार्जन मिळवून देणारी आंबा व काजू महत्त्वाची पिके. रत्नागिरी जिल्हा डोंगरदऱ्यातून विभागलेला आहे. कातळावर, डोंगरावर कलम बागायती लागवड़ उन्हाळ्यात पाण्याची टंचाई. सध्या जिल्ह्यात उन्हाळी शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे. बंधारे बांधून पाणी अडवून भाजी, कलिंगडे, भात, भुईमूग, मका, सूर्यफूल तसेच वेलवर्गीय अन्य भाज्यांचे उत्पादन घेण्यात येत असल्यामुळे या शेतीतून चांगले उत्पन्न घेण्यासाठी तुषार सिंचन पध्दती फायदेशीर आहे.
ठिबक सिंचन योजना अनुदानात घट
By admin | Published: October 02, 2016 11:26 PM